गारपिटीने महाबळेश्वर, पाचगणीतील स्ट्रॉबेरी धोक्यात

जोरदार गारांच्या वर्षावाने स्ट्रॉबेरी शेतीत अक्षरशः बर्फाची चादर पसरल्याने स्ट्रॉबेरी पीक धोक्यात आले आहे
गारपिटीने महाबळेश्वर, पाचगणीतील स्ट्रॉबेरी धोक्यात

ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर तालुक्यात वादळी पावसासह गारांनी हजेरी लावल्याने पर्यटक आनंदित झाले होते, मात्र, सलग दोन दिवस गारपिटीसह जोरदार पडणाऱ्या पावसाने स्ट्रॉबेरीची व अन्य पिकांची मोठी हानी झाली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जोरदार गारांच्या वर्षावाने स्ट्रॉबेरी शेतीत अक्षरशः बर्फाची चादर पसरल्याने स्ट्रॉबेरी पीक धोक्यात आले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांवर वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

महाबळेश्वर तालुका हा दुर्गम, डोंगरी व दऱ्याखोऱ्यांचा आहे. तेथील मुख्य पीक स्ट्रॉबेरी असून या पिकावर येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून असते. भिलार,पाली, खिंगर, राजपुरी आदी परिसरात तर पाचगणीतील काही गावांत मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी पीक घेतले जाते. महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड होते. त्यातील एकट्या भिलार परिसरात सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड केली जाते. मात्र मागील काही दिवसात पडणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपिटीने परिसरातील स्ट्रॉबेरी फळांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीने फळे व स्ट्रॉबेरीच्या रोपांची पाने खराब झाली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मिलारे यांनी परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन स्ट्रॉबेरी शेतीची पाहणीही केली.यावेळी अध्यक्ष भिलारे यांनी अवकाळी पावसासह गारपिटीमुळे स्ट्रॉबेरीचे मोठ्या।प्रमाणात नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in