
सातारा जिल्ह्यात ऐन फेब्रुवारी महिन्यापासून तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअस गेल्याने याचा शेतीसह सर्वच दैनंदिन व्यवहार परिणाम झाला आहे.सध्या मार्च महिना संपत आला असून या महिन्यात खास करून महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि येथील आंबा या पिकावर वाढत्या तापमानाचा परिणाम स्ट्रॉबेरीसह इतर पिकांवर झाला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि वाई, जावळी तालुक्यात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी जास्त असून त्यांच्या स्ट्रॉबेरी पिकांवर परिणाम होत असलयामुळे नुकसानीचं संकट कोसळलं आहे.
सातारा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला असून सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाच्या झळा बसत असल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या ऊसाला काहीसा ब्रेक लागला आहे.मात्र महाबळेश्वर, जावळी, वाई तालुक्यातील स्ट्रॉबेरी हंगामाला फटका बसत आहे. सध्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्यातील हंगाम सुरू असून उन्हाच्या तीव्रतेमुळे स्ट्रॉबेरी लवकर पक्व होऊ लागली आहे.मात्र वाढत्या तापमानात स्ट्रॉबेरी फळाना चटके पडणे, कमी आकारमानात ही पक्व होत असल्याने वजन कमी होणार असून चवीवरही परिणाम होणार आहे. यामुळे अंतिम टप्प्यात होणाऱ्या फायदा शेतकऱ्यांचा मिळणार नाही.
स्ट्रॉबेरीसह आंबा मोहरातून फळधारणेच्या सुरू झाली आहे. तापमानवाढीमुळे फळगळ असून मोठ्या फळांना चट्टे पडत आहेत तर तापमान वाढीमुळे स्ट्रॉबेरी फळांच्या अगोदर उमलणारी फुले हि कोमेजून जात असून त्याचे फळांमध्ये रूपांतर होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.
स्ट्रॉबेरीचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नेटचे आच्छादन : उमेश खामकर
महाबळेश्वर आणि वाईची स्ट्रॉबेरी विशेष प्रसिद्ध असून, सध्या अनेक शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. आम्ही वाई तालुक्यात पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. साधारणतः सहा महिन्याचा फळांचा कालावधी असल्याने या स्ट्रॉबेरी शेतीतून चांगले उत्पादन मिळते. मात्र, सध्या वातावरणात उष्णता वाढू लागली असल्यामुळे त्याचा फटका स्ट्रॉबेरी फळावर बसू लागला आहे. तापमान वाढीमुळे फुल गळती होऊ लागली असून स्ट्रॉबेरीचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही नेटच्या आच्छादन केले असल्याची प्रतिक्रिया वाई तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उमेश खामकर यांनी दिली आहे.
तापमानवाढीचा असा होतो परिणाम
हवामानातील बदलामुळे तापमानात वाढ होते ज्यामुळे स्ट्रॉबेरीच्या झाडावर उष्णतेचा ताण पडतो ज्यामुळे फुलांची कमतरता येते, फळे लवकर पिकतात ज्यामुळे फळांचे गुण कमी होतात, लहान आकार, कमी साखर, कमी सुगंध आणि खराब पोत. याव्यतिरिक्त, कीटक आणि रोगांच्या प्रादुर्भाव आणि तीव्रतेवर परिणाम होतो
वातावरणातील बदल शेतकऱ्यांसाठी ठरली डोकेदुखी
दर्जेदार म्हणजेच एक नंबर दर्जाची स्ट्रॉबेरी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दरापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच बहुतांशी हा माल प्रक्रियेसाठी द्यावा लागत असल्याने अपेक्षित पैसे मिळत नाहीत. उष्णता वाढीमुळे फुलगळ होत असल्यामुळे फळाविना झाडे पोसण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास या हंगामात ५० टक्के उत्पादनात घट होण्याचा शक्यता वर्तवली जात आहे. स्ट्रॉबेरीस भांडवली खर्च जास्त असल्याने वातावरणातील बदल हा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे.