लासलगाव : राज्यभरातील कोट्यवधींच्या जमिनीवर कब्जा करणाऱ्या भूखंड माफियांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.त्यासाठी वक्फ मंडळाने कायदेशीर बाबींच्या निपटारा करण्या साठी लीगल सेल नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्जा यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची तीन दिवसीय बैठक औरंगाबाद संभाजीनगर येथे पार पडली. यावेळी बोर्डाला अधिक सक्षम बनविण्याचे साठी अनेक महत्वपूर्ण निर्णय ही सर्वानुमते घेण्यात आले. बैठकीत डॉ. वजाहत मिर्जा मंडळ सदस्य खासदार फौजियाखान,खासदार इम्तियाज जलील,आमदार फारूक शहा,मौलाना अथर अली,हसनैन शाकिर, मुदसीर लांबे,समीर काजी,उपमुख्यकार्यकरी अधिकारी जुनेद सय्यद व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.मुख्यकार्यकारी अधिकारी मोईन ताशीलदार यांनी व्हिडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभाग घेतला.
लीगल सेलमूळे नामांकित वकील मिळणार
राज्यातील अनेक मोक्याच्या जमिनींचे प्रकरण सुरू आहेत. याबाबत कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून राज्यातील नामांकित लीगल फर्मची नेमणूक करण्यात आली आहे. सोलापूरच्या चिरागली कब्रस्तान व पुण्याच्या आलमगीर मशीद बाबत अनेक तक्रारी होत्या. त्याबाबत बोर्डाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तसेच औरंगाबाद शहरातील एका मोठ्या व मोक्याच्या जागेविषयी ही सदस्यांनी अत्यंत गंभीरतेने चर्चा करून प्रकरण लवकरात लवकर मार्गी काढण्याचा निर्णय घेण्यात आला.आता वक्फ जमिनीबाबत तक्रारींच्या निपटाऱ्या साठी वक्फ मंडळ लीगल सेल कडे प्रकरण वर्ग करणार आहे. त्यामुळे याचा फायदा भविष्यात दिसून येईल. तसेच बोर्डाच्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या पॅनलवर वकील नेमण्याचा निर्णय ही घेण्यात आला.