जव्हार : देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील पोलीस दल अधिक सक्षम आहे. असे सांगत पालघर पोलीस अधीक्षक बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच त्यांनी जिल्ह्यातील परिक्षेत्रात भेटी देऊन पोलीस दलाच्या कामाचा आढावाही घेतला.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जव्हार येथे स्ट्राँगरूमला भेट दिली, यावेळी पोलीस उपविभागीय अधीक्षक गणपतराव पिंगळे, जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, पाटील यांनी स्ट्रॉंगरूमची व्यवस्था व बंदोबस्ताची पाहणी केली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालये, पोलीस ठाण्यांत अचानक भेट देऊन कामाचा आढावाही त्यांनी घेतला. निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यात बाहेरूनही पथक आले आहे.
गुन्ह्यांच्या पद्धती बदलत असून सोशल मीडियातून अफवा पसरविण्याचे प्रमाणही वाढले आहे. लोकसभा निवडणुकांचा काळ असल्याने अशा अफवा रोखण्यासाठी आणि संबंधितांपर्यंत वेळेत पोचण्यासाठी सोशल मीडिया सेल अधिक ॲक्टिव्ह केला जाईल. पोलिसांचे मत जास्तीत जास्त लोक, पोलीस पाटील व सरपंचापर्यंत पोचण्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे फेसबुक आणि यूट्यूब पेज तयार केले जातील, असे पाटील यांनी सांगितले.
चेकपोस्ट लावून सीमा सील
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असून, जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेकपोस्ट सुरू करण्यात आली आहेत. जशी निवडणूक जवळ येईल, त्यात आणखी वाढ करण्यात येईल. शांततेच्या वातावरणात निवडणूक पार पडावी, यासाठी समाजविघातक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. काहींना हद्दपार केले आहेत. प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे नियोजन झाले आहे.