देवकरांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध; कार्यालयात प्रवेश बंदीचा लावला फलक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा करताच अजित पवार गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली.
गुलाबराव देवकर,अजित पवार (डावीकडून)
गुलाबराव देवकर,अजित पवार (डावीकडून)
Published on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा करताच अजित पवार गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. देवकर आणि त्यांच्या समर्थकांना अजितदादा गटात प्रवेश देवू नये यासाठी जिल्हयातील अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून प्रवेश विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .

अजित पवार गटाच्या कार्यालयात देवकरांविरोधात प्रवेश बंदीचा फलक देखील लावण्यात आला आहे. गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शरद पवार गटाकडून लढली होती. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी त्यांचा लाखाच्यावर मते घेत पराभव केला होता. या पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडत देवकरांनी आपण अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सुनील तटकरे यांच्या भेटीनंतर जाहीर केले हाते.

विधानसभा निवडणुकीत प्रचारसभात देवकरांनी अजित पवारांच्या विरोधात गलिच्छ व अर्वाच्य भाषेचा वापर केला असल्याचे अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असून यामुळे या प्रवेशाला त्यांनी विरोध केला आहे. तसेच गुलाबराव देवकर हे जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष असून या मजूर फेडरेशनच्या व इतर भ्रष्टाचारापासून संरक्षण मिळवण्यासाठी ते अजित पवार गटात येत असल्याचा आरोप रविवारी ओबीसी सेलचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व अन्य पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन या पदाधिकाऱ्यांनी केला.

सुनील तटकरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देवकरांच्या प्रवेशास अद्याप संमती दिलेली नाही असे स्पष्ट केल्याचे ज्ञानेश्वर महाजन यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in