
नाशिक : खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून झालेल्या वादाची परिणती दहावीच्या विद्यार्थ्याची क्लासमधील दोन अल्पवयीन मित्रांनी मारहाण करून हत्या होण्यात झाल्याची धक्कादायक घटना सातपूर भागात समोर आली आहे.
यशराज तुकाराम गांगुर्डे (१६) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, यशराज आणि क्लासमधील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये गेल्या बुधवारी बेंचवर बसण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद मिटला असे वाटत असतानाच क्लासच्या आवारामध्ये तिघांमध्ये पुन्हा वाद झाला. दोन्ही अल्पवयीन मित्रांनी यशराजला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे यशराज जागीच कोसळला. त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अभ्यासात हुशार असलेल्या यशराज याचा स्वभाव मनमिळावू होता. त्याचे कोणाशीही भांडण नव्हते. असे असताना मित्रांनी त्याला मरेपर्यंत मारहाण करावी, हे धक्कादायक असल्याचे त्याच्या कुटुंबियांचे मत आहे. कोरोना काळात पितृछत्र गमावलेल्या यशराज याची स्वप्ने मोठी होती, असेही कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले.