२८ वर्षांपासून धरणगावच्या विद्यार्थिनींची अनोखी देशसेवा; सीमेवरील जवानांसाठी बनवल्या राख्या

सीमेवर लढणारा जवान एकटा नाही, तर संपूर्ण देश त्याच्या पाठीशी उभा आहे, ही कृतज्ञतेची भावना आपल्या कृतीतून व्यक्त करत, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी गेल्या २८ वर्षांपासून एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवत आहेत.
२८ वर्षांपासून धरणगावच्या विद्यार्थिनींची अनोखी देशसेवा; सीमेवरील जवानांसाठी बनवल्या राख्या
Published on

जळगाव : सीमेवर लढणारा जवान एकटा नाही, तर संपूर्ण देश त्याच्या पाठीशी उभा आहे, ही कृतज्ञतेची भावना आपल्या कृतीतून व्यक्त करत, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी गेल्या २८ वर्षांपासून एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवत आहेत. या विद्यार्थिनी आपल्या खाऊच्या पैशातून साहित्य आणून, स्वतःच्या हातांनी राख्या तयार करून त्या सीमेवरील जवानांना पाठवतात. यंदाही ३०० विद्यार्थिनींनी बनवलेल्या १२०० तिरंगी राख्या नाशिक येथील लष्करी कंटोन्मेंटकडे रवाना करण्यात आल्या आहेत.

सुमारे २८ वर्षांपूर्वी, शाळेचे तत्कालीन पर्यवेक्षक राजेंद्र पडोळ यांनी एका लेखात सैनिकाचे मनोगत वाचले. सीमेवर आम्हा सैनिकांसाठी सर्व दिवस सारखेच असतात, सण-वार नसतात, हे वाक्य वाचून ते अस्वस्थ झाले. या सैनिकांसाठी आपण काहीतरी करायला हवे, या विचाराने त्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन सीमेवरील जवानांना राख्या पाठवण्याची कल्पना मांडली.

विद्यार्थिनींनीही या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाऊबीज आणि इतर वेळी खाऊसाठी मिळणारे पैसे एकत्र करून त्यांनी राखी बनवण्यासाठी लागणारी लोकर, रेशीम धागे आणि सजावटीचे साहित्य आणण्याची तयारी दर्शवली. शाळेच्या कला शिक्षकांनी त्यांना राख्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले. यानंतर मुली शाळेच्या वेळेपूर्वी एक तास आधी येऊन मोठ्या उत्साहाने राख्या तयार करू लागल्या.

आज राजेंद्र पडोळ सेवानिवृत्त झाले असले, तरी या उपक्रमात ते आजही सक्रिय सहभाग घेतात. नाशिकहून राख्या सीमेवर पोहोचल्याचा फोन आला की, शाळेतील त्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि होणारा जल्लोष हा या उपक्रमाचे खरे यश दर्शवतो.

logo
marathi.freepressjournal.in