पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्गातच; पालकमंत्र्यांचे शिक्कामोर्तब

सिंधुदुर्गात साकारल्या जाणाऱ्या पाणबुडी प्रकल्पात कर्मचाऱ्यांसह २४ प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून न्याहाळता येणार असून या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी ५ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तर १०० ते १५० कोटींची उलाढाल होणार आहे.
पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्गातच;  पालकमंत्र्यांचे शिक्कामोर्तब

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ला येथेच होणार असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यावरून राजकारणही सुरू झाले होते. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहणार असल्याची ग्वाही दिली होती. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे.

सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्रविश्व पाहण्यासाठी राबवण्यात येणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातच्या द्वारका येथे जाणार असल्याचे सांगितले जात होते. यावर रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या 'एक्स'हँडलवर माहिती दिली आहे. "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तसेच नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे. मात्र, आपल्या राजकीय स्वार्थासाठी विरोधक या प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली", असे ते म्हणाले.

या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यस्थिती व वस्तुस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे(एमटीडीसीकडे) वर्ग करण्यात आला आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही व सदर प्रकल्प सकारात्मक पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी उपस्थितांना दिल्याचेही त्यांनी सांगितले

या बैठकीला पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी- शर्मा यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे हे व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते, अशी माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली.

काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्रातील २०१८ सालातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्रविश्व पाहता येईल आणि याद्वारे एकाचवेळी २४ प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून न्याहाळता येईल असे समजते. यामुळे पहिल्या वर्षी ५ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तर १०० ते १५० कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in