बारा वर्षाच्या लढ्याला यश; सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतीला परवानगी

सर्वोच्च न्यायालयाने राज्यसरकारने केलेला कायदा वैध ठरवत बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे.
बारा वर्षाच्या लढ्याला यश; सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतीला परवानगी
Published on

तब्बल बारा वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश आले असून बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यतीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्यसरकारने केलेला कायदा वैध ठरवत बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांनी एकच जल्लोष करत आनंद साजरा केला आहे. तसेच एकमेकांना पेढे भरवले आहेत. राष्ट्रवादीचे खासदार आमोल कोल्हे यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून पेढे भरवून आनंद साजरा केला आहे.

राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभेचे खासदार आमोल कोल्हे, शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे हे नेते बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत होते. बैलगाडा शर्यत हा खेळ राज्यभरात मोठ्या उत्साहात भरवला जातो. पश्चिम मराराष्ट्रातील शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतीचा चांगलाच लळा आहे. यामुळे देशी गोवंशाचे जतन व संवर्धन केले जाते, असे देखील या नेत्यांकडून सांगितले जाते. न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर नेत्यांच्या प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि आताच्या शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत. सरकारने दिलेल्या सकारात्मक निर्णयाने तसेच शेतकरी आणि विविध संघटनांनी केलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असल्याचे म्हणत त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, "बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळणार नाही, असे भल्या-भल्यांना वाटत होते. मात्र, परवानगी मिळणार याबाबत मी आधीपासूनच ठाम होतो आणि तसेच घडले. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला दिलेली परवानगी हा अत्यंत आनंद निर्माण करणारा क्षण असून यामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये उत्साह भरणार आहे", असे कोल्हे म्हणाले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली हा अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. सरकारसह शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सरकारने केलेला कायदा वैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचा आनंद आहे," असे म्हणत त्यांनी सगळ्याचे अभिनंदन केले आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाबाबत बोलताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे, तर महाविकास आघाडीवर टीका केली आहे. याबाबत पडळकर म्हणाले की, "बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळा अहवाल तयार केला. यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजे. महाविकास आघाडीच्या काळात कोर्टाची साधी तारीख लागली नाही. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना आलेले हे यश आहे", असे पडळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यामुळे जोमाने बैलगाडा शर्यती भरवल्या जाणार आहेत. बैलगाडा प्रेमी तसेच शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे उत्साह संचारला आहे.

logo
marathi.freepressjournal.in