नाशिक विमानसेवेचे यशस्वी उड्डाण; वर्षभरात प्रवासी संख्येत ७६ हजार ७८९ ने वाढ

रेशनकार्ड संबंधित कामकाज करणारी राज्य शासनाची आरसीएमएस (रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम) गेल्या दोन महिन्यांपासून (नोव्हेंबर २०२४ पहिला आठवडा) बंद पडली आहे.
नाशिक विमानसेवेचे यशस्वी उड्डाण; वर्षभरात प्रवासी संख्येत ७६ हजार ७८९ ने वाढ
Published on

हारून शेख/ लासलगाव

ओझर (नाशिक) विमानतळावरून २०२४ या वर्षात तब्बल तीन लाख एक हजार ९०८ प्रवाशांनी प्रवास केला. वर्षभरात प्रवासी संख्येत ७६ हजार ७८९ ने वाढ झाली असून २०२३ मध्ये दोन लाख २५ हजार ११९ प्रवासी संख्या होती. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे नाशिकच्या हवाई सेवेने यशस्वी उड्डाण घेतल्याचे म्हटले जात आहे.

ओझर विमानतळावरून २०२२ मध्ये इंडिगो कंपनीने सेवा सुरू केली. सध्या ओझर विमानतळावरून नवी दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, गोवा, नागपूर, लखनऊ, हैदराबाद, इंदूर या देशातील अनेक महत्त्वाच्या शहरासाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी नाशिक येथून नवी दिल्ली, बंगळुरू, लखनऊ व जयपूर ही विमान सेवा सुरू झाल्याने प्रवासी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

२०२३ मध्ये दर महिन्याला अठरा हजार ७६० प्रवाशांनी प्रवास केला. सन २०२४ मध्ये हाच आकडा २५ हजार १५९ वर पोहोचला तर नोव्हेंबर २०२४ मध्ये सर्वाधिक ३४ हजार २२६ प्रवाशांनी तर एप्रिल महिन्यात सर्वात कमी म्हणजे १५ हजार ६४९ प्रवाशांनी प्रवास केला.

गेल्या वर्षभरात अहमदाबाद, गोवा, इंदूर, जयपूर या विमानसेवांमध्ये अंशत: कपात करण्यात आली तसेच डिसेंबरमध्ये काही दिवस धुके व अन्य तांत्रिक कारणामुळे नवी दिल्ली सेवा बंद होती. त्यामुळे प्रवासी संख्येत काहीसी घट झाली अन्यथा गेल्या वर्षीच्या तुलनेत सन २०२४ मध्ये एक लाखांपर्यंत प्रवाशांची संख्या पोहचली असती.

२०२५ या नवीन वर्षात ओझर विमानतळावरून कोलकाता, चेन्नईसाठी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शिवाय देशातील अन्य महत्त्वाची शहरे नाशिकची जोडली जाण्याची शक्यता आहे. नाशिकहून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत चाचपणी सुरू आहे. नाशिकच्या हवाई सेवेला प्रवाशाकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून पुढील काळात त्यात आणखीन वाढ होईल. २०२५ या वर्षात अन्य विमान कंपन्यांकडून सेवा सुरू केली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे नाशिककरांना आणखी पर्याय उपलब्ध होतील.

- मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, निमा

logo
marathi.freepressjournal.in