शपथविधीची जय्यत तयारी; आझाद मैदानावर होणार महायुतीचा महासोहळा शिवाजी पार्क, बीकेसी-एमएमआरडीएचे मैदान अनुपलब्ध

राज्यातील सहा कोटींहून अधिक मतदारांनी महायुतीला सत्ता स्थापनेसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदानातून कौल दिला. मात्र १० दिवस उलटले तरी मुख्यमंत्री कोण यावर महायुतीत घमासान सुरू आहे. मुख्यमंत्री कोण याबाबत अद्याप अस्पष्टता असली तरी शपथविधी सोहळ्याची तयारी मात्र जोरात सुरू आहे. हा सोहळा आझाद मैदानात होण्याचे सांगितले जाते.
शपथविधीची जय्यत तयारी; आझाद मैदानावर होणार महायुतीचा महासोहळा शिवाजी पार्क, बीकेसी-एमएमआरडीएचे मैदान अनुपलब्ध
Published on

राज्यातील सहा कोटींहून अधिक मतदारांनी महायुतीला सत्ता स्थापनेसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदानातून कौल दिला. मात्र १० दिवस उलटले तरी मुख्यमंत्री कोण यावर महायुतीत घमासान सुरू आहे. मुख्यमंत्री कोण याबाबत अद्याप अस्पष्टता असली तरी शपथविधी सोहळ्याची तयारी मात्र जोरात सुरू आहे. हा सोहळा आझाद मैदानात होण्याचे सांगितले जाते.

येत्या ६ डिसेंबरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान आरक्षित आहे. तर बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदानही यापूर्वीच आरक्षित झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळेच महायुतीचा महा शपथविधी सोहळा अखेर आझाद मैदानावर होणार असल्याचे महायुतीतील नेत्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने मतांच्या रूपात सत्ता स्थापनेचा कौल दिला. २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केल्याचा आरोप मविआच्या नेत्यांनी केला आहे, तर दुसरीकडे महायुतीला एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला आहे. मात्र १० दिवस उलटले तरी मुख्यमंत्री कोण यावरच बैठकांचे सत्र सुरू आहे. मुंबई ते दिल्ली जोरदार बैठका सुरू असून गुरुवारी सायंकाळी काळजीवाहू मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला रवाना झाले. अमित शहा यांच्या बरोबर महायुतीतील तिन्ही प्रमुख नेत्यांची अमित शहा यांच्या बरोबर चर्चा झाली. मात्र मुख्यमंत्री कोण याबाबतचे चित्र अद्यापही अस्पष्ट आहे.

एकमेव पर्याय उपलब्ध

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याची लगीनघाई महायुतीतील नेत्यांना झाली आहे. त्यामुळे आधी वानखेडे स्टेडियमनंतर शिवाजी पार्क मैदान, तर बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान याची चाचपणी झाली. मात्र बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान आधीच बुक करण्यात आले आहे. तर शिवाजी पार्क मैदानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंडप, स्टाॅल उभारणी येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानात ही महायुतीचा शपथविधी सोहळा होणे अशक्य झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in