कराड : राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कृष्णा कारखान्यातील विविध प्रकल्पांना भेटी देऊन, कारखान्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. प्रारंभी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सायली पुलकुंडवार यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. पुलकुंडवार यांनी कारखान्याच्या आधुनिकीकरण कामाची पाहणी केली. कारखाना राबवित असलेल्या सभासद हिताच्या योजनांची माहिती, मोफत घरपोच साखर, जयवंत आदर्श कृषी योजनेअंतर्गत जीवाणू खत प्रकल्प उभारणी व एकरी १०० टन उत्पादन वाढ योजनेची माहिती त्यांना देण्यात आली.