साखरेला ‘महागाईची उकळी’; १५ दिवसांत किलोमागे २० रुपयांची उसळी, इथेनॉल निर्मिती, व्यापाऱ्यांच्या मोठ्या खरेदीचा परिणाम

देशातील साखर उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ३० लाख टनांची घट, इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर आणि कमी पावसाच्या अंदाजामुळे व्यापारी व ट्रेडर्सकडून झालेली मोठी खरेदी, या कारणांमुळे साखरेच्या दराला चांगलीच उकळी आली आहे.
साखरेला ‘महागाईची उकळी’; १५ दिवसांत किलोमागे २० रुपयांची उसळी, इथेनॉल निर्मिती, व्यापाऱ्यांच्या मोठ्या खरेदीचा परिणाम
साखरेला ‘महागाईची उकळी’; १५ दिवसांत किलोमागे २० रुपयांची उसळी, इथेनॉल निर्मिती, व्यापाऱ्यांच्या मोठ्या खरेदीचा परिणाम'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सुजित ताजणे/छत्रपती संभाजीनगर

देशातील साखर उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ३० लाख टनांची घट, इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर आणि कमी पावसाच्या अंदाजामुळे व्यापारी व ट्रेडर्सकडून झालेली मोठी खरेदी, या कारणांमुळे साखरेच्या दराला चांगलीच उकळी आली आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेचा प्रतिक्विंटल दर ४३०० ते ४५०० रुपयांवरून थेट ६५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे किलोमागे सुमारे २० रुपयांची वाढ झाली असून, सर्वसामान्यांच्या घरखर्चावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष तथा नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी साखरेच्या दरवाढीची कारणे स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील हंगामात देशात ३३० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. प्रत्यक्षात सुमारे ३०० लाख टन उत्पादन झाले. त्यापैकी जवळपास ३० लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आली. त्यामुळे देशांतर्गत विक्रीसाठी सुमारे २७० लाख टन साखर उपलब्ध झाली. प्रत्यक्षात देशांतर्गत गरज २८० ते २८५ लाख टन आहे. त्यामुळे मागणी आणि उपलब्धता यामध्ये तफावत निर्माण झाली आहे.

कारखान्यांना केंद्र सरकारकडून दरमहा साखर विक्रीचा कोटा निश्चित करून दिला जातो. त्यानुसार साखर विक्री करणे कारखान्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे सध्याच्या दरवाढीत कारखान्यांची कोणतीही भूमिका नसल्याचे ठोंबरे यांनी स्पष्ट केले. दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना सुरू असून, सणासुदीच्या काळात पुरेशी उपलब्धता राहावी, यासाठी १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर्स फॅक्टरीजचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, आर्थिक अडचणीत असलेल्या काही कारखान्यांनी हंगामात ‘रिलीज’पेक्षा अधिक साखर विक्री केली; मात्र साठा तितकाच दाखविला. सरकारकडे अद्याप तीन महिने पुरेल एवढा साखरेचा साठा आहे. साखर कमी असल्याची कुणकुण लागल्याने चढ्या भावाने विक्री सुरू झाली आहे. जुना मोंढ्यातील ठोक व्यापारी संजयकुमार कांकरिया म्हणाले की, साखरेचा दर सध्या ६५ रुपये किलोच्या आसपास स्थिर आहे. ३० ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या शासकीय विक्री कोट्यावर पुढील दराची दिशा ठरणार आहे. कोटा कमी राहिल्यास दर पुन्हा वाढू शकतात; तर पुरवठा सुरळीत राहिल्यास दर सध्याच्या पातळीवर टिकून राहण्याची शक्यता आहे.

इथेनॉलच्या दरवाढीचा थेट परिणाम आमच्या घरखर्चावर जाणवू शकतो. पेट्रोल-डिझेलसह वाहतूक खर्च वाढल्यास भाजीपाला, किराणा आणि दैनंदिन वस्तू महागण्याची शक्यता आहे. सरकारने दरवाढीचा भार सर्वसामान्य महिला आणि कुटुंबांच्या बजेटवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

गीता रायमाने, वेदांतनगर

साखरेच्या दरात वाढ होणे हे सामान्य नागरिकांच्या महिन्याच्या ताळेबंदावर परिणाम करणारे आहे. साठेबाजीमुळे निर्माण झालेली कृत्रिम टंचाई आणि इथेनॉलसंबंधी धोरणामुळे भारताला मागील दहा वर्षांत पहिल्यांदाच साखर आयात करावी लागत आहे. या दरवाढीचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला तर आपण समजू शकतो; मात्र तशी शक्यता दिसून येत नाही.

श्रीकांत येरूळे

साठेबाजीवर प्रशासनाची करडी नजर

साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांकडील साठ्याची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. नोंदवहीतील साठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठा याची पडताळणी पुरवठा विभागाकडून केली जाणार आहे. साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून दर वाढविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा थेट फटका ग्राहकांना बसू शकतो. सणासुदीच्या काळात मागणी वाढत असल्याने साखरेचा पुरवठा आणि दरांवर प्रशासनाने करडी नजर ठेवणे आवश्यक असल्याचे मत सुरेंद्र अहिरराव यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in