साखर निर्यातीस परवानगी धुसर; घटत्या उत्पादनाचा फटका

आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रमी दर असल्याने साखर उद्योग निर्यातीच्या निर्णयाकडे साखर उद्योगाचे डोळे लागुन राहिले आहेत.
साखर निर्यातीस परवानगी धुसर; घटत्या उत्पादनाचा फटका

(रमेश जाधव)

सध्या देशातील साखर उत्पादन अंदाजापेक्षा जास्त प्रमाणात घटत असल्याने केंद्राकडून मोठ्या प्रमाणात साखर निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता धुसर बनली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रमी दर असल्याने साखर उद्योग निर्यातीच्या निर्णयाकडे साखर उद्योगाचे डोळे लागुन राहिले आहेत.

केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी असल्याने आम्ही तातडीने आणखी निर्यातीला परवानगी देणार नाही, असे सूचित केले होते. मार्चपर्यंत साखर उत्पादनावर लक्ष ठेवून एप्रिलमध्ये याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, गेल्या वर्षीपेक्षा यंदा देशातील साखर उत्पादन घटल्याने केंद्र सरकार आणखी साखर निर्यातीला परवानगी देईल, अशी फारशी शक्यता नसल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. अगदी निर्णय घ्यायचा झाला तर केवळ पाच ते सहा लाख टन साखर निर्यात करण्याबाबत विचार होऊ शकतो. परंतु, एकुण उत्पादनाच्या तुलनेत पाच ते सहा लाख टन साखर निर्यात ही अत्यल्प असल्याने याचा फारसा फायदा साखर कारखान्यांना होणार नाही, असे चित्र आहे.

यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या टप्प्यात ऊस क्षेत्र ज्यादा असल्याने उत्पादनही वाढेल, असा अंदाज साखर उद्योगाचा होता. हंगाम संपताना हे चित्र उलटे दिसले. त्यामुळे साखर निर्यातीच्या नव्या परवानगीला देखील ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साखरेचे उत्पादन घटल्याने आणखी निर्यातीला परवानगी देण्याची गरज नाही, असा सूर केंद्रीय अधिकाऱ्यांचा आहे. तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील कारखानदारांच्या शिष्टमंडळाला सहकार मंत्री अमित शहा यांनी निर्यातीला परवानगी देऊ, असा शब्द दिला होता. त्यानंतर मात्र फारशा हालचाली झाल्या नाही.

चालू वर्षीच्या गळीत हंगामात अपेक्षेपेक्षा कमी साखरेचे उत्पादन होईल, असे वाटले नव्हते. मात्र, तसे घडत आहे. त्यामुळे साखर निर्यातीला परवानगी मिळावी, यासाठी सर्वच कारखानदार आणि साखर उद्योग सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. नव्या साखर निर्यातीला परवानगी मिळाली तर साखर कारखान्यांचा फायदाच होईल, असे आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांनी सांगितले.

२५ लाख टनांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता

यंदा साखरेचे उत्पादन ३५९ लाख टनांवरून ३३६ लाख टनापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. उत्पादन घटण्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात साखर उत्पादन १३५ लाख टनापर्यंत जाईल, अशी शक्यता होती. हंगाम सुरू झाल्यानंतर ती १२० लाख टनांपर्यंतच गृहीत धरण्यात आली. प्रत्यक्षात उत्पादन पाहता ११० लाख टनही उत्पादन होणार नाही, अशी स्थिती आहे. ब्राझील देशाची साखर आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचण्यास वेळ असल्याने सध्या तेथे तेजी सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in