ऊसतोड मजुरांची विदारक कहाणी; नव्या कामाच्या शोधात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू अशी भटकंती

पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडले, तमिळनाडूपर्यंत मजल मारली; मात्र तेथील ऊसतोड हंगाम संपताच पुन्हा नव्या कामाच्या शोधात कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्राकडे धाव घ्यावी लागत आहे.
ऊसतोड मजुरांची विदारक कहाणी; नव्या कामाच्या शोधात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू अशी भटकंती
ऊसतोड मजुरांची विदारक कहाणी; नव्या कामाच्या शोधात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू अशी भटकंती
Published on: 

सुजित ताजणे

छत्रपती संभाजीनगर : पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडले, तमिळनाडूपर्यंत मजल मारली; मात्र तेथील ऊसतोड हंगाम संपताच पुन्हा नव्या कामाच्या शोधात कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्राकडे धाव घ्यावी लागत आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या आयुष्याची ही विदारक कहाणी आहे. दुष्काळामुळे कमी झालेला ऊस, साखर कारखान्यांचा आक्रसलेला हंगाम आणि ऊसतोडणीतील वाढते यांत्रिकीकरण यामुळे मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. घेतलेली उचल फेडायची आणि वर्षभराचा संसार चालवायचा, तर स्थलांतराशिवाय पर्याय उरलेला नाही.

बीड जिल्ह्यातील अनेक ऊसतोड मजूर गेल्या काही महिन्यांपासून तमिळनाडूमधील साखर कारखान्यांवर काम करत होते. आता तेथील हंगाम संपत आल्याने काही मजूर कर्नाटकातील धारवाड, हुबळी परिसराकडे निघाले आहेत, तर काहींनी सांगली जिल्ह्यातील विटा परिसरातील कारखान्यांकडे मोर्चा वळवला आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात रोजगारासाठी सुरू असलेली ही धावपळ म्हणजे दुष्काळाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेला मोठा तडाखा आहे.

कर्जफेडीसाठी दोन-तीन वेळा स्थलांतर

ऊसतोडणी मजुरांना हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखानदार किंवा मुकादमाकडून उचल मिळते. ही रक्कम घेतल्यानंतर ठराविक हंगामात ऊसतोडणी करून ती फेडण्याची जबाबदारी मजुरांवर असते. मात्र, यंदा दुष्काळामुळे ऊस उपलब्धता कमी झाल्यास कामाचे दिवसही घटण्याची भीती आहे. परिणामी, एका हंगामात मिळणारी मजुरी अपुरी पडण्याची शक्यता वाढली आहे. बीड तालुक्यातील लखन बरडे या मजुराने यंदा तमिळनाडूमध्ये ऊसतोडणीचे काम केले. मात्र, वर्षभराचा खर्च भागवण्यासाठी आणि पूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी काम शोधावे लागत आहे.वर्षभराचा घरखर्च चालवायचा असेल, तर यंदा दोनदा ऊसतोडणी करावीच लागणार होती. याच कारणामुळे आम्ही तमिळनाडूला गेलो. आता काही जण कर्नाटकात आले आहेत. तर जानेवारी-फेब्रुवारीनंतर पुणे, मुंबई किंवा जिथे काम मिळेल तिथे जावे लागेल,’ अशी व्यथा लखन बरडे यांनी मांडली.

भिल्ल वस्तीवर उदासीनतेचे सावट

बीड तालुक्यातील शिवणी गावाजवळ एका छोट्या डोंगरावर भिल्ल वस्ती आहे. या वस्तीतील अनेक कुटुंबे ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेली आहेत. काहींची कच्ची-पक्की घरे, अंगणातली चूल आणि संसाराचा मोजकाच पसारा मागे राहिला आहे. अंगणात मोबाइलभोवती जमलेली मुले, घराच्या कोपऱ्यात बसलेल्या वृद्धा आणि रोजगारासाठी बाहेर पडलेल्या कुटुंबांची प्रतीक्षा, असे चित्र येथे दिसते. राम कल्याण बरडे हे गेल्या तीन महिन्यांपासून तमिळनाडूमध्ये ऊसतोडणीचे काम करत होते. इरोड परिसरातील कारखान्यात काम केल्यानंतर तेथील हंगाम संपल्याने आता पुढील रोजगारासाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे. वस्तीतील अनेक कुटुंबांतील पुरुष-महिला बाहेरगावी असल्याने गावातील दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम जाणवत आहे.

‘रोहयो’च्या मजुरीतून संसार चालवायचा कसा ?

दुष्काळाची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, रोजगार हमी योजनेतील मजुरी आणि प्रत्यक्ष जीवनावश्यक खर्च यातील तफावत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रतिदिन ३१७ रुपयांच्या मजुरीतून कुटुंबाचा खर्च भागवणे, कर्ज फेडणे आणि मुलांचे शिक्षण सुरू ठेवणे अनेक कुटुंबांसाठी कठीण ठरत आहे. त्यामुळे ऊसतोडणीचा हंगाम संपला की गावाकडे परतण्याऐवजी मजुरांना दुसऱ्या कारखान्याचा किंवा शहरातील रोजगाराचा शोध घ्यावा लागत आहे.

दुष्काळ, कर्ज, वाढत्या बेरोजगारीशी संघर्ष

तमिळनाडू, कर्नाटक, सांगली, पुणे आणि मुंबई असा सुरू असलेला प्रवास केवळ रोजगाराचा शोध नाही, तर दुष्काळ, कर्ज आणि वाढत्या बेरोजगारीशी सुरू असलेला संघर्ष आहे.दुष्काळाने शेतातील ऊस आक्रसला, यांत्रिकीकरणाने हातातील काम कमी केले आणि कर्जाने मजुरांना गावाबाहेर ढकलले. आता या मजुरांच्या वाट्याला स्थिर रोजगार कधी येणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in