मुंबई : राज्यातील १४ आयटीआयची नावे बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. आता राज्यातील ४१८ आयटीआयची नावे बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या आयटीआयची नावे सुचवण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे.
‘एफपीजे डॉयलॉग’ या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
समाजासाठी मोठे योगदान देणाऱ्या दिग्गज व्यक्तींची नावे आयटीआयला देण्यात आली आहेत. यात काही ज्येष्ठ समाजसुधारकांचाही समावेश आहे.
कौशल्य विकास आणि मनुष्यबळ विकास खात्याबाबत ते म्हणाले की, सध्याच्या युगात या विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. तरुणांच्या गरजेनुसार शैक्षणिक धोरणे तयार करणे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या स्टार्टअपसाठी निधी देणे आदी कामे केली जातात, असे त्यांनी सांगितले.
सरकारच्या विविध योजनांचा समाजातील विविध घटकांना फायदा होतो. राज्य सरकारने राबविलेल्या कार्यक्रमांबाबत ते म्हणाले की, बेरोजगारी ही तरुणांना भेडसावणारी गंभीर समस्या असल्याने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रशिक्षण हा सर्व कार्यक्रमांचा गाभा आहे. ज्यामुळे रोजगाराची समस्या सोडवण्यास मोठी मदत होईल, असे ते म्हणाले.
युवा रोजगार योजनेतंर्गत ८० हजार जणांना रोजगार मिळाला आहे. या योजनेत आतापर्यंत ३ लाख युवकांनी नोंदणी केली आहे. पारंपरिक कौशल्यांसाठी ‘विश्वकर्मा योजना’ सुरू केली आहे. यात कौशल्य विकास करून तरुणांना रोजगार देण्यात येणार आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना सुरू केली. राज्य सरकारने ५०० स्टार्टअपना २५ लाखांची मदत राज्य सरकारने केली. पनवेल येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या विद्यापीठासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.