
धनंजय कवठेकर/ अलिबाग
रायगड जिल्ह्यातील मौजे थळ येथे झालेल्या शेतजमीन खरेदी व्यवहारात शासकीय अटींचा भंग झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी महसूल विभागाने चौकशी सुरू केली असून निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी तहसीलदार, अलिबाग यांना दोन दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर जमीन व्यवहारात अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना शाहरुख खान हिचे नाव आल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मौजे थळ येथील गट क्र. ३४५/२ मधील सुमारे दीड एकर (०.६०.७० हे.आर.) शेती जमीन तिच्या नावे खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ॲॅड. विवेकानंद ठाकूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ३१ मे २०२३ रोजी अंजली खोटे यांनी दुय्यम निबंधक, अलिबाग यांच्या कार्यालयात (नोंदणी क्र. अ.ल.ब. २२२४/२०२३) साठेखत करून मिळकतीचा ताबा सुहाना खानकडे दिला. वारंवार मागवलेल्या अहवालात शासकीय अटींचा भंग झाल्याचे स्पष्ट नमूद झाले असून, तक्रारदारांनी संबंधित जमीन सरकारजमा करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना आदेश दिले आहेत की, सर्व पक्षांची बाजू ऐकून, साठेखतासह संबंधित कागदपत्रे व माध्यमांतील रिपोर्ट विचारात घेऊन तपशीलवार अहवाल दोन दिवसांत सादर करावा.
या प्रकरणात सुहाना खान यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण?
१९६८ मध्ये मौजे थळ येथील सर्व्हे क्र. ३४५/२, क्षेत्रफळ ०.६०.७० हे.आर. जमीन लागवडीसाठी "ना विक्री" अटींसह नारायण विश्वनाथ खोटे यांना देण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी शिवाय या जमिनीची विक्री, गहाण किंवा हस्तांतरण करता येणार नाही अशी अट होती. तथापि, खोटे कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता १ जून २०२३ रोजी १२.९१ कोटी रुपयांना नोंदणीकृत साठेकराराद्वारे सुहाना खान हिला जमीन विकली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.