

नांदेड/चंदीगड : शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गुरुवारी नांदेड शहराच्या वेशीवर असलेल्या एका गुरुद्वारात निहंग शिखाकडून ‘कृपाण’ने (धार्मिक कट्यार) हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले आहे. बादल यांचे मेहुणे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते विक्रमसिंग मजीठिया यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी १.४५ च्या सुमारास नांदेडपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘गुरुद्वारा माता साहिब देवाण जी मुगत’ येथे घडली. गुरुद्वाराच्या पायऱ्या उतरत असताना बादल यांच्यावर हल्ला झाला. व्हीआयपी सुरक्षेत तैनात असलेले विशेष संरक्षण युनिटचे पोलीस अधिकारी संतोष केंद्रे हे बादल यांचा बचाव करताना जखमी झाले. हल्ल्यानंतर बादल यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या उजव्या हाताला दोन ते तीन टाके घालण्यात आले आहेत. वैद्यकीय उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेनंतर शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याचा आरोप केला आहे. बादल यांचे मेहुणे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते विक्रमसिंग मजीठिया यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. कोणीही 'गुरुघरात' असा हल्ला करत नाही, अशा प्रकारची कृत्ये केवळ नास्तिक प्रवृत्तीचे लोकच करू शकतात, असे मजीठिया यांनी सांगितले. पक्षाचे प्रवक्ते अर्शदीप सिंग क्लेर यांनीही पंथिक नेत्यांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत या षड्यंत्रामागे कोणत्या शक्ती आहेत, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
पूर्वइतिहास आणि सुरक्षा
६४ वर्षीय सुखबीरसिंग बादल यांना 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. मात्र, सीआयएसएफ कव्हर केवळ पंजाब आणि दिल्लीपुरते मर्यादित असल्याने घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत पंजाब पोलीस आणि स्थानिक पोलीस पथक तैनात होते. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात धार्मिक सेवा (सेवादार) बजावत असतानाही त्यांच्यावर बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या माजी दहशतवाद्याने गोळीबार केला होता, त्यातून ते बालंबाल वाचले होते.
भाजपा नेते आर. पी. सिंग यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या हिंसक घटनेचा कडक शब्दांत निषेध केला असून, "लोकशाहीत राजकीय मतभेदांना स्थान आहे, परंतु हिंसाचाराचे कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही," असे नमूद केले आहे.
मोदींकडून विचारपूस
नांदेडमधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून बादल यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आणि लोकसभा खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बादल यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती घेतली. या घटनेच्या वेळी त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. या घटनेच्या काही दिवस आधीच, म्हणजेच ७ ऑगस्ट रोजी बादल यांनी मोदी यांची भेट घेतली होती. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून हल्ल्यामागील हेतू शोधण्याचे निर्देश दिले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी सुखबीरसिंग बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.