रायगड-रत्नागिरीत तिरंगी सामना? रायगडचा गड कोण राखणार !

रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारीची जोरदार तयारी केली होती. काल सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे रायगड भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. सुनील तटकरे यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांनी सावध पवित्रा घेत सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे.
रायगड-रत्नागिरीत तिरंगी सामना? रायगडचा गड कोण राखणार !

अरविंद गुरव / पेण

यावर्षी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघाची होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची लक्षवेधी ठरणार आहे यावेळी ही निवडणूक त्रिशंकू होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाकडून) सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली असून शिवसेना (उबाठा गटाकडून) माजी मंत्री अनंत गीते तर भाजपचे जिल्हाध्यक्ष व शेकापक्षाचे प्रस्थापित नेते तसेच निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले धैर्यशील पाटील यांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्याने ते अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीची निवडणूक त्रिशंकू होणार असल्याचे चित्र सध्या रायगडात दिसत आहे.

राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गेल्या काही वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये केलेल्या तोडा फोडीच्या राजकारणाचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी निर्माण केलेल्या नाराजीच्या चक्रविहातून तटकरे कसे बाहेर पडतील यावर त्यांच्या विजयाची धुरा अवलंबून आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत सन २०२० मध्ये शिवसेनेच्या नाराजी नाट्यामध्ये जिल्ह्यातील तीन आमदारांचे मोलाचे योगदान आहे. या नाराजी नाट्याची सुरुवात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापासून झाली त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे तीन आमदार सुनील तटकरे यांना विजयासाठी मनापासून मदत करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) माध्यमातून तीन पक्षांची एकत्रितपणे मते मिळणार असली तरी मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये सुनील तटकरेंवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (शरद पवार गट) किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेले नेते आणि शिवसेनेमधील काही नेते डोकेदुखी ठरू शकतात. रायगड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता या मतदार संघातील अनेक राजकीय नेते, जे सुनील तटकरेंवर नाराज आहेत किंवा नाराज होऊन पक्ष सोडून युतीमधील इतर पक्षात गेले आहेत असे अनेक राजकीय नेते सुनील तटकरेंना मदत करतील का ? हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारीची जोरदार तयारी केली होती. काल सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे रायगड भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. सुनील तटकरे यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांनी सावध पवित्रा घेत सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे. सुरुवातीपासूनच रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजपला उमेदवारी मिळावी यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारिणी ठाम होती. त्यासाठी गेल्या तीन- चार महिन्यांपासून लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची सभा संमेलन घेत वातावरणनिर्मिती देखील केली जात होती. यातून खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात टोकाची टीका देखील करण्यात आली होती. रायगडची जागा भाजपला मिळाली नाही तर वाईट घडेल, असा सूचक इशारा आमदार रवींद्र पाटील यांनी दिला होता. सुनील तटकरे उमेदवार नकोच यासाठी भाजपची जिल्हा कार्यकारिणी आग्रही होती.

तर दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या विरोधात उभे ठाकलेले उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा विजयाचा कुणबी पॅटर्न यावेळी डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे. कुणबी समाजातून गीते यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे २१ हजार ७००

मतांनी निवडून आले होते. तटकरेंनी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना पराभवाचा धक्का दिला होता. तर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना यांना ३ लाख ९४ हजार ०६८ मतं मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते केवळ २ हजार ११० मतांनी विजयी झाले होते. कुणबी पॅटर्नच्या बळावर निवडणुकीचा गड सर करणाऱ्या अनंत गीते यांना आता कुणबी समाजातील लोकच तुम्ही समाजासाठी काय केले ? असा प्रश्न विचारू लागले आहेत. तटकरे आणि गीते या दोघांनाही उमेदवारी मिळाली असली, तरी नाराजीच्या चक्रव्यूहातून ते कसे बाहेर पडणार हाच खरा प्रश्न आहे. हा प्रश्न जो उमेदवार प्रभावीपणे सोडवेल त्याची निवडणुकीत सरशी होऊ शकते, असा राजकीय निरीक्षकांचे मत आहे, मात्र ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल आणि सोपी नसेल असाही अंदाज आहे.

अपक्षाला भाजपची साथ

धैर्यशील पाटील यांना उमेदवारीनाकारली असली तरी त्यांच्या समर्थक कार्यकर्ते व स्थानिक नेते यांनी धैर्यशील पाटील यांना अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीप्रमाने जिल्ह्यात उरण पॅटर्न राबविण्याच्या तयारीत भाजप असणार आहे. धैर्यशील पाटील हे अपक्ष म्हणून रायगड लोकसभा मतदार संघाच्या मैदानात उभे राहू शकतात व त्यांना भारतीय जनता पक्षाचा पूर्ण पाठिंबा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे भाजप आणि पूर्वाश्रमीचे शेकापचे कार्यकर्ते सुनील तटकरे यांना कितपत मदत करतील हे सांगता येणार नाही.

गीतेंना सहानुभूतीचा लाभ?

राजकीय गणिते मांडताना सर्वच पैलूंचा विचार नेहमी केला जातो. तसाच यावेळीही करावा लागेल. भाजपमुळे फुटलेल्या शिवसेनेतुन अनेक नेते, मंत्री आणि खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले असले तरी सामान्य शिवसैनिक मात्र आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबच असल्याची भूमिका ठाकरे गटा कडून मांडली जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मिळत असलेली सहानुभूती गीतेंच्या पथ्यावर पडेल का ? आणि याचा फायदा अनंत गीते यांना मतदानाच्या रुपात मिळेल का ? हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल.

रायगडमधील राजकीय चाणक्य 'सुनील तटकरे'

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले सुनील तटकरे हे सुद्धा राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्याबाबत स्वपक्षीय आणि मित्र पक्षांमध्ये असलेली नाराजी ते कशी दूर करू शकतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे, मात्र नाराजीचा चक्रव्यूह भेदून बाहेर येणे म्हणावे इतके तटकरे यांच्यासाठी सोपेही नाही, परंतु कठीणही नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in