अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे; सुनील तटकरेंची भूमिका

अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण पाहता आले असते. मात्र आता विलीनीकरणाबाबत पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार निर्णय घेतील.
सुनील तटकरे
सुनील तटकरेसंग्रहित छायाचित्र
Published on: 

पुणे : अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण पाहता आले असते. मात्र आता विलीनीकरणाबाबत पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार निर्णय घेतील. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेले अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवे, अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.

सुनील तटकरे यांनी मंगळवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यानंतर ते म्हणाले की, “ पाडव्याच्या दिवशी अजित पवार आपल्यात नसताना इथे येण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे, याचे आम्हाला प्रचंड दुःख आहे. गेली ३० वर्षे आम्ही पाडव्याला बारामतीला येतो, पण या वर्षी बारामतीमध्ये उसळलेला जनसागर आम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. बारामतीमधील पाडवा अजित पवारांशिवाय साजरा होत आहे, हे मनाला पटणे कठीण आहे. आम्ही फक्त त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होण्यासाठी इथे आलो आहोत. अशावेळी कोणतेही राजकीय वक्तव्य करणार नाही. मात्र तरीही विलिनीकरणाचा मुद्दा असेल, तर पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार याच त्यासंदर्भातील निर्णय घेतील.

पटेल-शरद पवार भेट राजकीय नाही

“शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्या भेटीमागे कोणतेही वेगळे राजकीय कारण नाही. तसेच प्रत्येक राजकीय भेटीमागे राजकीय अर्थ शोधण्याची गरज नसते. राजकारणाच्या पलीकडेही काही नाती जपावी लागतात. आपल्या राजकीय कारकिर्दीत दिवंगत वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख आणि अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या सर्वांकडून राजकारणाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक नाती कशी जपायची आणि जोपासायची, हे शिकायला मिळाले, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.