मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांच्या विलीनीकरणाच्या इच्छेबद्दल जे बोलत आहेत त्यांनी २०१९, २०२१ आणि २०२२ मध्ये भाजपप्रणित आघाडीत सामील होण्याच्या इच्छेबद्दलही बोलावे, असे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोणाचेही नाव न घेता सांगितले.
आता आम्ही भाजपप्रणित एनडीएमध्ये आहोत आणि त्याचाच एक भाग राहू. विलीनीकरणाची योजना अशा प्रकारे आखली होती का की आम्ही एनडीएमध्येच राहू? त्याबद्दल स्पष्टता मिळाल्यास मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यावर भाष्य करू शकेन, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा आणि पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड या दोन्ही गोष्टी एकच कशा असू शकतात? तीन दिवसांचा दुखवटा संपल्यानंतर आम्ही आमच्या नेत्याच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली, असे तटकरे म्हणाले.
अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी दावा केला होता की, विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात होती आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांच्या एकीकरणाची घोषणा करण्यासाठी १२ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती.
अजित पवार यांचे पार्थिव अद्याप अंत्यसंस्कारासाठी नेले नसतानाही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत मुलाखती का दिल्या जात होत्या, असा प्रश्न तटकरे यांनी विचारला.
सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावीत - भुजबळ
महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी सांगितले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली पाहिजेत. २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे सर्वोच्च पद रिक्त झाले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या भुजबळ यांनी येथे पत्रकारांना सांगितले की, त्या जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा मी त्यांची भेट घेऊन त्यांना ही विनंती स्वीकारण्याची विनवणी करेन. सर्व निर्णय सुनेत्रा पवार यांच्याशी सल्लामसलत करूनच घेण्यात आले आहेत, असे सांगून भुजबळ म्हणाले की, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड हा देखील एक सामूहिक निर्णय होता, तो कोणत्याही एका विशिष्ट नेत्याचा किंवा नेत्यांचा निर्णय नव्हता.
सुनेत्रा पवार यांच्या निवडीत घाई नाही - तटकरे
अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा दुखवटा संपल्यावर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी झालेली निवड घाईची का म्हणावी, असा प्रश्न महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विचारला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना तटकरे म्हणाले की, नवीन विधिमंडळ पक्षनेता निवडणे हा त्यांचा अधिकार होता. त्यात घाई कुठे होती? असा प्रश्न त्यांनी विचारला.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आणि इतर चार जणांचा २८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी बारामती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने ३१ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. त्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली.