पुणे पदवीधरची जागा न मिळणे आमचे अपयश; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कबुली

विधान परिषदेची पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची होती. मात्र, ही जागा पक्षाला मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच कमी पडलो असून, हे आमचे सामूहिक अपयश मानले पाहिजे, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी दिली.
पुणे पदवीधरची जागा न मिळणे आमचे अपयश; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कबुली
पुणे पदवीधरची जागा न मिळणे आमचे अपयश; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कबुली
Published on: 

मुंबई : विधान परिषदेची पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची होती. मात्र, ही जागा पक्षाला मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच कमी पडलो असून, हे आमचे सामूहिक अपयश मानले पाहिजे, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, महायुती म्हणूनच ही निवडणूक लढविली जावी, यासाठी चर्चा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादीला मिळावी, असा पक्षाचा आग्रह होता. या मतदारसंघातून अरुण लाड हे निवडून आले होते. नंतरच्या राजकीय घडामोडी वेगळ्या असल्या तरी त्यावेळी झालेले मतदान हे पक्षाच्या चिन्हावर झाले होते. त्यामुळे पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी आमची ठाम भूमिका होती, असे तटकरे यांनी सांगितले.

महायुतीत विधानपरिषदेच्या जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या स्तरावर झाला. सुनेत्रा पवार यांनी या चर्चेत राष्ट्रवादीची भूमिका मांडली. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्याने त्यांनी एकट्याने चर्चा केल्याचा वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही, असेही तटकरे यांनी नमूद केले.

विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्ची मुदत संपली असली तरी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. त्यामुळे अद्याप चर्चेची संधी आहे. ही निवडणूक महायुती म्हणून लढविली गेली पाहिजे, ही आपली भूमिका असून पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर गरज पडल्यास मुख्यमंत्री तसेच केंद्रातील नेतृत्वाचीही भेट घेऊ, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

पुणे पदवीधरची जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी झाली, असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in