रायगडमध्ये तटकरेंचे वर्चस्व कायम; पुन्हा केला अनंत गीतेंचा पराभव

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा पहिलावहिला खासदार म्हणून निवडून येण्याचा मान...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

अरविंद गुरव/पेण, धनंजय कवठेकर/अलिबाग

महाराष्ट्रात एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरवत रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा अनंत गीते यांना धूळ चारत रायगडचा गड दुसऱ्यांदा राखत दिल्लीच्या तक्तावर रायगडचा शिलेदार होण्याचा मान राखला. ५०८३५२ च्या अधिक मताधिक्यांनी सुनील तटकरे रायगडात विजयी झाल्याचे प्राथमिक वृत्त आले आहे. खऱ्या अर्थाने सुनील तटकरे यांच्या विजयामध्ये आमदार रविशेठ पाटील आणि जिल्हाध्यक्ष आ. धैर्यशील पाटील यांचा मोठा वाटा असून रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख भाजपचे धुरंदर नेते सतीश धारप यांच्या कुशल रणनीतीचा हा विजय आहे. सुनिल तटकरे यांच्या विजयाने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा पहिलावहिला खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला आहे. सुनील तटकरे यांच्या विजयामुळे पूर्ण रायगडमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

टपाली मतमोजणीत अनंत गीते यांना २४३१ मते तर सुनील तटकरे यांना १८२३ मते मिळाली या मतमोजणीत अनंत गीते ६०८ मतांनी आघाडीवर होते. तर सुनील तटकरे हे पहिल्या फेरी पासूनच आघाडीवर होते. तटकरे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत मतांच्या आघाडीची पकड कायम ठेवली. या निवडणुकीमध्ये २७ हजार २७० नोटा या बटनाचा वापर झाला.

तटकरेंकडून गीतेंचा पुन्हा पराभव

२०२४ च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी अधिक मताधिक्याने विजय संपादन केला आहे. यंदाच्या निवडणुकीत तटकरेंना ५०८३५२ मते मिळाली तर अनंत गीते यांना ४२५५६८ मते मिळाली. त्यामुळे यंदा तटकरे यांनी ८२७८४ मतांनी गीतेंचा पराभव केला. त्यामुळे मागील तीन निवडणुकांपैकी यंदाच्या निवडणुकीत तटकरे अधिक मताधिक्काने निवडून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे २१ हजार ७०० मतांनी निवडून आले होते. तटकरेंनी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना पराभवाचा धक्का दिला होता. तर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना ३ लाख ९४ हजार ०६८ मतं मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते केवळ २ हजार ११० मतांनी विजयी झाले होते.

यावेळी झालेल्या चुका आम्ही सुधारू

"महायुतीमधील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक याला इथल्या जनतेने साथ दिली. मी रायगड, रत्नागिरीमधील जनतेचा ऋणी आहे. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. महायुतीला कोकणात मोठे यश मिळाले आहे. महविकास आघाडीने ज्या पद्धतीने ग्रामपातळीवर कार्यकर्त्यांची फळी अगदी सुरुवातीपासून तयार केली. दुर्दैवाने तशी फळी तयार करण्यात आम्ही अपयशी ठरलो. यावेळी झालेल्या चुका आम्ही सुधारू, राष्ट्रवादी काँगेसने यावेळी ४ जागा लढवल्या, त्यातील एकच जिंकलो. हे अपयश का मिळाले याचे आम्ही आत्मपरीक्षण करू. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून यापुढे काम करणार आहे. केवळ लोकसभेपुरता नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात सर्व जागा जिंकून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेसला यावेळी निश्चित यश मिळाले आहे. कारण यावेळी सर्व पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले होते, तरीही देशातील जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही ही वस्तुस्थिती मान्य आहे." -सुनील तटकरे, महायुतीचे रायगड लोकसभा विजयी उमेदवार

"सुनील तटकरे यांचा झालेल्या विजयामध्ये रायगड जिल्ह्यातील जनतेचा येथील शेतकऱ्यांचा त्याचबरोबर भाजपचे आ. रवीशेठ पाटील, जिल्हाध्यक्ष माजी आ. धैर्यशील पाटील अलिबागचे आ. महेंद्रशेठ दळवी आणि आम्ही स्वतः जे मनापासून काम केले आहे. त्या कामाचा मोबदला मतदारांनी मताच्या रूपात तटकरेंच्या झोळीमध्ये टाकत तटकरे यांचा विजय सुखकर केला. गुहागर आणि दापोली येथून तटकरे यांना फार कमी मतदान झाले असल्याचे या आकडेवारीमध्ये दिसून आले आहे. जातीच्या आणि समाजाच्या फॅक्टरचा फायदा तसेच लोकांची खोटी सहानुभूती घेत त्याचा फायदा विरोधी उमेदवार अनंत गीते यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे, नाहीतर सुनील तटकरे यांचा विजय दीड ते दोन लाख मताधिक्याने निश्चित होता." -आ. भरतशेठ गोगावले - प्रतोद - शिवसेना (शिंदे गट)

logo
marathi.freepressjournal.in