
कराड : सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना फलटण तालुक्यातील विडणी गावात गत तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. विडणीत ऊसाच्या शिवारात अंधश्रद्धेतून महिलेचा निघृण खून करण्यात आला. या निर्घृण खुनाच्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून घटना उघड झाल्याच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी मृत महिलेच्या हाताचे अवशेष सापडले आहेत. नैवेद्य म्हणून चारही दिशेला मृतदेहाचे चार तुकडे टाकले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मृतदेहाचा उर्वरित भाग अद्यापही सापडत नसल्याने ते शोधण्याचे तसेच खुनाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अवयव शोधण्यास अडथळा येऊ नये यासाठी घटनास्थळापासून ५०० मीटर परिसरात ऊसतोड कामगार, शेत मालकांशिवाय इतरांना पोलिसांनी प्रवेश बंदी केली.
१५ एकर शेतात अवयवांचा शोध
दरम्यान महिलेच्या शरीराचा कवटी व कमरेखालचा भाग व आता हात सापडला असला तरी उर्वरित भाग अद्यापही सापडत नसल्याने व घटनास्थळाच्या परिसरातील सुमारे १५ एकराहून अधिक ऊस तोडण्यात आला आहे. मात्र याबाबत पोलीस यंत्रणेच्या हाती आरोपी व ठोस पुरावा सापडत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.तसेच घटनास्थळी गुलाल अन् कापलेले काळे केस यांच्यासह ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला त्या ऊसाच्या शेतात काही अंतरावर नारळ,गुलाल, महिलेचे केस कापलेले, तेलाचा दिवा, काळी बाहुली, सुरी आढळून आली. त्यामुळे हा प्रकार नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.त्यानुसार पोलीस तपस सुरु आहे.