
गेवराई : ज्या उमेदवाराला पाडावेसे वाटेल त्या उमेदवाराला मराठा समाजाने खुशाल पाडावे, ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्या सर्वांना पाडून टाका, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी गेवराई येथे स्थानिकांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करणाऱ्या जरांगे यांनी कोणाला पाडावयाचे आणि कोणाला पाठिंबा द्यावयाचा, याबाबत रविवारी घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार गेवराई येथे स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.
राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यांनी एकही उमेदवार दिलेला नाही. मात्र कुणाला पाडायचे आणि कुणाला निवडून आणायचे याबाबत मनोज जरांगे यांनी रविवारी मोठे विधान केले आहे. मी सरळ सांगतो, तुम्हाला लिहून घेणे किचकट वाटले तर सरळ ज्याला पाडावेसे वाटेल त्याला पाडून टाका. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्या सर्वांना पाडून टाका, असे मनोज जरांगे म्हणाले. ते बीड जिल्ह्यातील गेवराईत स्थानिकांशी बोलत होते.
मतदानासाठी लांबलचक रांगा लावून नको असलेल्या उमेदवारांना पाडा, त्यांच्याकडून काहीही लिहून घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही अडचणीत येऊ नका. लोकसभेला सांगितले होते आणि आता पण सांगत आहे. पाडापाडी करा, आता गरीबाला किंमत आली आहे. मराठा आंदोलनाला, गोरगरीब मराठा आणि ओबीसीमधील छोट्या छोट्या जातीला किंमत आली आहे ज्याने आरक्षणाला विरोध केला त्याला पाडा, असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे काय म्हणाले
आपण सर्व जाती-धर्माचा सन्मान केला पाहिजे. मराठा समाजाला वाटले तर उमेदवाराकडून लिहून घ्या, व्हिडीओ करा. मी राज्यातील सर्व उमेदवारांना ओळखत नाही. गावातील माणसाला वाटते त्याला निवडून द्या, नाही समजले तर पाडून टाका. मी सरळ सांगतो, तुम्हाला लिहून घेणे किचकट वाटले तर सरळ ज्याला पाडावे वाटेल त्याला पाडून टाका. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्या सर्वांना पाडून टाका. माझा हा राजकीय दौरा नाही, हा सामाजिक दौरा आहे. आपण आपल्या आंदोलनाची तयारी करू. आपल्याला सामूहिक उपोषण करायचे आहे, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे.
सामूहिक उपोषण करणार, एक लाखाहून अधिक जण सहभागी होणार
मनोज जरांगे यांनी आता सामूहिक उपोषण करणार असल्याचे जाहीर केले असून त्यामध्ये एक लाखाहून अधिकजण सहभागी होणार आहेत. जरांगे यांनी बुधवारपासून बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केलीय. गेवराई तालुक्यातील त्वरिता देवीचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. अशातच मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये आज गेवराईमध्ये समर्थकाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास्थळी जरांगे यांनी पुन्हा मोठे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. उपोषणाला येत असताना समाज बांधवांनी आपल्याला आवश्यक असणारे सर्व साहित्य घेऊन यावे, तसेच विशेष करून येत असताना अंथरणे व पांघरण्यासाठी कपडे देखील घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारची झोप उडवण्यासाठी आता मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. यांना मराठा समाजाचा काय हिसका आहे ते दाखवूनच देऊ, उपोषणासारखी ताकद कोणत्याही आंदोलनामध्ये नाही. एक लाख समाज बांधव उपोषणाला बसल्यानंतर किती डॉक्टर त्यांना लागतील हे सांगता येत नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.