तुतारी हे चिन्ह अन्य कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला देऊ नये. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची नोंदणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाला देत सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला आज (दि.१९) दिलासा दिला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तुतारी हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने पवार गटाला दिली.
दुसरीकडे, अजित पवार गटाला मात्र सर्वोच्च न्यायालयाने इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांमध्ये जाहीरनामा जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना दिलेले 'घड्याळ' चिन्ह हे खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की नाही या प्रलंबित खटल्याच्या निकालाच्या अधीन असल्याचे जाहीर करावे, असे कोर्टाने सांगितले. अजित पवार गटाने मतदानाशी संबंधित सर्व जाहिरातींमध्ये 'घड्याळ' निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची घोषणा केली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मूळ पक्षनाव आणि पक्षचिन्ह दोन्ही अजित पवार गटाकडे गेल्याने या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला शरद पवार यांचे नाव किंवा छायाचित्र कोणत्याही निवडणूक प्रचार साहित्यात वापरण्यास यापूर्वीच मनाई केली आहे.