गौतम नवलखा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

एल्गार परिषद-माओवादी लागेबांधे प्रकरणातील आरोपी आणि मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
गौतम नवलखा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

नवी दिल्ली : एल्गार परिषद-माओवादी लागेबांधे प्रकरणातील आरोपी आणि मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. नवलखा यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने नजरकैदेत असताना त्यांच्या सुरक्षेवर झालेला २० लाख रुपयांचा खर्च भरण्याचेही आदेश दिले आहेत.

गौतम नवलखा हे यापूर्वी अटकेत होते आणि त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून नजरकैदेत होते. त्यांच्याविरुद्ध अद्याप आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. नवलखा यांना डिसेंबर २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुदत मागितल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. मात्र, अद्यापही आरोप निश्चित करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

पुण्यात डिसेंबर २०१७ मध्ये एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. तेथे प्रक्षोभक भाषण करून जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून एकूण १६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी पाच जण सध्या जामिनावर कारागृहाबाहेर आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in