शरद पवार गटाच्या याचिकेवरील सुनावणी संपली, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला होता.
शरद पवार गटाच्या याचिकेवरील सुनावणी संपली, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्ष (एनसीपी) आणि घड्याळ चिन्हाबाबत अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह आपल्या पक्षालाच मिळावं यासाठी शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात या गटाने धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान, या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली असून कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देश देताना म्हटलंय की, निवडणुकीपर्यंत त्यांना (शरद पवार गट) दिलेलं नाव कायम ठेवा. तसंच नव्या चिन्हाबाबत निश्चित कालावधीत निकाल द्यावा. अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हेच त्यांचं चिन्ह. असा निकाल निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी दिला होता. परंतु, या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज कोर्टाने नोटीस काढलीय.

सुप्रीम कोर्टानं नोटिशीत काय म्हटलंय ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगाने ७ फेब्रुवारीला शरद पवार गटाला दिलं होतं. ते नाव निवडणूक होईपर्यंत कायम ठेवा. शरद पवार नवं चिन्ह मिळवण्यासाठी पुन्हा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात. शरद पवार गटाच्या पुढील अर्जावर आठवड्याभरात आयोगानं निर्णय द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या १५ फेब्रुवारीच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि राज्यघटनेतील पक्षांतरविरोधी तरतुदींचा वापर अंतर्गत असंतोष दडपण्यासाठी करता येणार नाही, असे नार्वेकर म्हणाले होते.

logo
marathi.freepressjournal.in