पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

निवडणूक घेतली तर काही महिन्यांतच कार्यकाळ संपेल, असा प्रतिवाद आयोगाकडून करण्यात आला होता.
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरात लवकर घेण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक होण्याची शक्यता आता जवळपास मावळली आहे.

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्यावी, यासाठी पुण्यातील सुघोष जोशी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. खासदार बापट यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झालेली नसल्याने या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न लोकसभेत कोण उपस्थित करणार, असा सवाल विचारत पोटनिवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला सूचना देण्यात याव्यात, याबाबत सुघोष जोशी यांनी कोर्टात धाव घेतली होती. यावर हायकोर्टाने तातडीने निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. याला निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पुण्यात पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यावेळी निवडणूक आयोगाने बाजू मांडताना, आम्ही २०२४ च्या निवडणूक कामात व्यस्त आहोत. तसेच देशात अन्य ठिकाणी निवडणुका सुरू आहेत.

या कारणास्तव पुण्याची पोटनिवडणूक घेणे शक्य नाही. आता निवडणूक घेतली तर काही महिन्यांतच कार्यकाळ संपेल, असा प्रतिवाद आयोगाकडून करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला सुनावत लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली.

logo
marathi.freepressjournal.in