सुप्रीम कोर्टाची ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष, चिन्हप्रकरणी सुनावणी आता २१ ऑक्टोबरला

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीचा 'तारीख पे तारीख' सिलसिला गुरुवारीही कायम राहिला.
सुप्रीम कोर्टाची ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष, चिन्हप्रकरणी सुनावणी आता २१ ऑक्टोबरला
प्रातिनिधिक फोटो
Published on

नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीचा 'तारीख पे तारीख' सिलसिला गुरुवारीही कायम राहिला. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी घेण्याचे मुक्रर करण्यात आले होते, मात्र आता ही सुनावणी चक्क २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अपात्रता याचिकेवरील चर्चेची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने शंका व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेने (उबाठा) केलेल्या याचिकेवरील सुनावणी १७ सप्टेंबरला होणार होती, ती आता २१ ऑक्टोबरला होणार आहे.

राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरी सर्वच राजकीय पक्षांनी भेटीगाठी, जागावाटप, आघाड्यांबाबत चर्चा सुरू केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात एकमेकांविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार गटांनी याचिकेवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे. तरीही गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे.

यापूर्वी याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली होती आणि ती गुरुवारी होणार होती. मात्र गुरुवारी पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता २१ ऑक्टोबर अशी नवी तारीख मुक्रर करण्यात आली आहे.

मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी दिलेली भेट ठरली वादग्रस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतल्याने नवा वाद उफाळून आला आहे. विरोधकांनी ही भेट परंपरा व संकेताला धरून नसल्याची टीका केली आहे. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी आणि सर्वोच्च न्यायालयातील काही वकिलांनीही या भेटीविरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, भाजपनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांची टीका अविवेकी असून सर्वोच्च न्यायालयावर शिंतोडे उडविल्याने धोकादायक प्रघात पडेल, असे भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांनी म्हटले आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला तत्कालीन सरन्यायाधीश उपस्थित राहिले नव्हते का, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत केला.

सरन्यायाधीशांनी आमदार अपात्रता खटल्यातून माघार घ्यावी - राऊत

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या याचिकांच्या सुनावणीतून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्वत: दूर व्हावे, अशी मागणी शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी जाऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतले. त्यावरून टीका होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही मागणी केली आहे. घटनेचे रक्षणकर्ते जेव्हा राजकीय नेत्यांची भेट घेतात तेव्हा जनतेच्या मनात संशय निर्माण होतो, असे राऊत म्हणाले. सरन्यायाधीश आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध आता उघड झाले आहेत. आमची याचिका चंद्रचूड यांच्यासमोर आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल का, याबद्दल साशंकता आहे. कारण केंद्र सरकार त्यामध्ये एक पक्षकार आहे आणि केंद्र सरकारचे नेतृत्व पंतप्रधान करीत आहेत, असे राऊत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in