Pune : सरसकट कर्जमाफी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांची मागणी, उजनी डेटा सेंटरसह विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
Pune : सरसकट कर्जमाफी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांची मागणी, उजनी डेटा सेंटरसह विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका
Pune : सरसकट कर्जमाफी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांची मागणी, उजनी डेटा सेंटरसह विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका(Photo-X/@supriya_sule)
Published on: 

पुणे : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत देणे म्हणजे त्यांच्या संकटाची थट्टा करण्यासारखे असल्याची टीकाही त्यांनी केली. इंदापूर येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उजनीतील एआय डेटा सेंटर, पीक पंचनामे, इथेनॉल धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

दुष्काळामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वारंवार छायाचित्रे काढून सादर करण्याच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागत असल्याचे सुळे यांनी नमूद केले. गुगल मॅप, उपग्रह आणि हवाई छायाचित्रणाच्या माध्यमातून दुष्काळी भागांची पाहणी करून पंचनामे करता येणार नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना तांत्रिक अटींच्या जाचातून मुक्त करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

इंदापूर तालुक्यातील लाकडी गावातील २३ विहिरींच्या मागण्या प्रलंबित असल्याचे सुळे यांनी सांगितले. https://www.freepressjournal.in/mumbai/maharashtra-drought-supriya-sule-demands-1-lakh-per-hectare-aid-for-farmers

दुष्काळग्रस्त कुटुंबांना अतिरिक्त मोफत धान्य देण्याची मागणी करताना त्यांनी उत्तर प्रदेशातील अन्नधान्य वितरणाच्या व्यवस्थेचा संदर्भ दिला. केंद्र सरकारच्या इथेनॉल उत्पादनासंबंधी धोरणावर टीका करताना सुळे म्हणाल्या की, इथेनॉलमधून साखर कारखान्यांना उत्पन्न मिळते आणि ऊस उत्पादकांची बिले देण्यास मदत होते.

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाला निष्पक्ष न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याच्या मृत्यूच्या घटनेबाबत चौकशी करून स्पष्टीकरण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, वैयक्तिक दुःखाचा उल्लेख करत सुळे यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले.

३१ तारखेला आंदोलन

उजनी धरणातील डेटा सेंटर आणि कर्जत-भीमाशंकर परिसरातील तीन हजार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांबाबत स्थानिकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप सुळे यांनी केला. उजनी डेटा सेंटरविरोधात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार रोहित पवार ३१ तारखेला आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in