पुणे : 'राज्यातील महत्त्वाचे मार्ग ठप्प झाल्यामुळे महाराष्ट्र जणू 'पॅरलाइज' झाला असून, सरकारने राज्यात तातडीने 'आणीबाणी' जाहीर करावी आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी,' अशी मागणी खासदार सुळे यांनी सोमवारी केली.
मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना महामार्ग आणि ताम्हिणी घाट हे तिन्ही मार्ग महत्त्वाचे वाहतुकीसाठी बंद आहेत. आळंदीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेला भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
'एकाच पावसात संपूर्ण महाराष्ट्र ठप्प होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हे सरकार स्वतःला 'इन्फ्रास्ट्रक्चरचे सरकार' म्हणवून घेते, पण जनतेची सुरक्षा आणि पर्यावरणाचा विचार नसेल तर अशा कामाचा काय उपयोग?" असा सवाल त्यांनी केला.
'या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण कामात स्पष्ट 'मिसमॅच' दिसत आहे. या प्रकल्पाचे सुरक्षा लेखीपरीक्षण झाले होते का? नियोजन करताना नैसर्गिक आपत्तींचा विचार केला होता का, पारदर्शक चौकशी सरकारने करावी,' अशी मागणी त्यांनी केली.
सत्तेतील नेते नेहमी विरोधकांकडे ७० वर्षांचा हिशोब मागतात, मात्र गेल्या १२ वर्षांपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या या लोकांच्या कामाचा हिशोब कोण देणार?, असा प्रश्न सुळे यांनी केला आहे.