विलीनीकरणाबाबत संभ्रम कायम; दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही - सुप्रिया सुळे

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी दोन्ही गटातील नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू असताना विलीनीकरणाबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे.
विलीनीकरणाबाबत संभ्रम कायम; दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही - सुप्रिया सुळे
विलीनीकरणाबाबत संभ्रम कायम; दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही - सुप्रिया सुळेसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी दोन्ही गटातील नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू असताना विलीनीकरणाबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणासंदर्भात आपल्याकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेचे गूढ वाढले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. याशिवाय खासदार पार्थ पवार यांनीही ‘सिल्वर ओक’वर जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांनी नवी दिल्लीत जाऊन भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात भेटीगाठींच्या निमित्ताने राजकीय हालचाली वाढल्या होत्या. त्यामुळे दिवाळीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाबाबत निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांचा प्रतिनिधींशी बोलताना, “अजितदादा हयात असताना विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते. पण अजितदादा गेल्यानंतर आतापर्यंत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आला नाही,” असे स्पष्ट केले. “विलीनीकरणाबाबत माझ्याशी कुणी बोललेले नाही. पवारसाहेबांना अनेक लोक भेटत असतात. त्यामध्ये नवीन किंवा वावगे काही नाही. अजित पवारांचा गट वेगळा झाला, तेव्हाही अनेक लोक पवारसाहेबांना भेटायचे,” असेही सुळे म्हणाल्या. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे विलीनीकरणाचे घोडे नेमके कुठे अडले आहे, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बुधवारी ‘जशी वेळ येईल, तशा सर्व गोष्टी समजतील,’ असे सांगून विलिनीकरणाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून चर्चा सुरू असली तरीही त्यांचे विलिनीकरण आमच्याशिवाय होणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलिनीकरणात भाजपची भूमिका निर्णायक राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

४१ आमदार सुनेत्रा पवारांसोबतच -तटकरे

ज्यांनी आम्हाला घडवले त्या देवतासमान पवार साहेबांना आजारपणात भेटायला जाणे हे आमचे कर्तव्यच आहे, मी सुद्धा मुंबईत आल्यावर त्यांना नक्की भेटायला जाणार आहे. आमचा पक्ष एकसंघ असून आमदार फुटण्याचा कोणताही प्रश्न नाही. ४१ आमदार सुनेत्रा पवारांसोबतच आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

भाजपसोबत विलीनीकरण नाही - रोहित पवार

विलीनीकरणाची चर्चा तर नाहीच आणि भाजपसोबत विलीनीकरणाचा तर विषयसुद्धा येत नाही, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे. त्यामुळे, आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण होणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे सत्तेचा अहंकार आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी माध्यमातून केली. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत, मुंढवाप्रकरणी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करूनही अजितदादांनी भाजपला कणभर देखील भीक घातली नव्हती. दादांना ब्लॅकमेल कोण करत होतं किंवा ब्लॅकमेल करण्याचे आदेश कुणाचे होते? त्यामुळे ब्लॅकमेलिंगच्या पायावर ज्यांचं राजकारण उभं आहे, अशा भाजपने आणि त्यांच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्र करण्याच्या विषयात न बोललेलंच बरं, असेही रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना नाव न घेता सुनावले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)