वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्यानं सुप्रिया सुळे संतापल्या, तर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला असून यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्यानं सुप्रिया सुळे संतापल्या, तर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
Published on

आज आळंदी येथून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं. या सोहळ्यासाठी हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले होते. यावेळी मंदिर प्रशासनाने ऐनवेळी मोजक्या वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिल्यानं इतर वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीसांनी बळाचा वापर करत वारकऱ्यांना रोखून धरलं. तसंच त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला असून यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेच्या कार्यध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध असो! या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यायी मागणी सुळे यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, वारीची शेकडो वर्षाची परंपरा आहे. आजवर जे कधीही घडलं नाही ते यंदा घडलं. वारकऱ्यांवर बळाचा वापर करण्याची घटना यापुर्वी कधीही घडली नव्हती. वारकऱ्यांनी आपल्या साध्या सोप्या शिकवणुकीतून देशाला दिली दाखवली आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळं माऊलींच्या दिंडी सोहळ्याला गालबोट लागलं. वारकऱ्यांवर केलेला लाठी हल्ला हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोशी असलेल्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

आळंदी येथे वारकऱ्यांवर केलेल्या लाठीमारनंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि सर्वत्र संतापाची लाट उसळली. अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. यानंतर पोलिसांकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. वारकऱ्यांवर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नसून झटापट झाल्याचं पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितलं आहे. मागच्यावर्षी या ठिकाणी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी काही महिला जखमी सुद्धा झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळ बैठका घेतल्या होत्या. यात गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक मानाच्या पालखीतील 75 जणांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in