सुप्रिया सुळे, पटोलेंवर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप; कायदेशीर कारवाईचा इशारा

पुण्यामधील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पुरावे सादर करताना ‘कॉल रेकॉर्डिंग’ आणि ‘व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट’ सादर केले.
सुप्रिया सुळे, सुधांशू त्रिवेदी, नाना पटोले (डावीकडून)
सुप्रिया सुळे, सुधांशू त्रिवेदी, नाना पटोले (डावीकडून)
Published on

पुणे : पुण्यामधील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पुरावे सादर करताना ‘कॉल रेकॉर्डिंग’ आणि ‘व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट’ सादर केले आणि ‘ऑडिओ क्लिप’मध्ये सुप्रिया सुळे यांचा आवाज असल्याचा आरोप केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो आवाज माझ्या बहिणीचाच असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, सुळे यांनी हे आरोप साफ फेटाळले असून, पटोले यांनी याविरुद्ध कायदेशीर लढाई लढणार असल्याचे म्हटले आहे.

सुप्रिया सुळेंनी बुधवारी सकाळी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना या आरोपांवर उत्तर दिले. मंगळवारी सायंकाळी मला माध्यमांमधून असे आरोप झाल्याचे समजले. माझ्या हातात ते ‘व्हॉइस रेकॉर्डिंग’ आल्यानंतर मी पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दूरध्वनी केला. काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहेत आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची आहे, असे त्यांना सांगितले. त्यांनी तक्रार करण्यास सांगितल्यानंतर मी मंगळवारी संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. या सगळ्या रेकॉर्डिंग्ज आणि संदेश खोटे आहेत असे तक्रारीत म्हटले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

त्रिवेदींविरोधात मानहानीचा दावा - सुप्रिया सुळे

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात आपण मानहानीचा दावा केल्याचेही सुप्रिया सुळेंनी सांगितले. सकाळी मी सुधांशु त्रिवेदींना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी मला पाच प्रश्न केले आहेत. त्यावर त्यांनी मला आव्हान दिले की बाहेर येऊन उत्तर द्यावे. मी बाहेर येऊन उत्तर द्यायला कधीही तयार आहे. सुधांशु त्रिवेदी ज्या शहरात, ज्या चॅनलवर, ज्यावेळी मला बोलवतील, त्यावेळी मी जाऊन उत्तर देईन. सगळे आरोप खोटे आहेत. त्यामुळेच मी सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे आणि नंतर मी अवमान याचिका दाखल केली आहे, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले.‘तो’ आवाज माझा नाही, हा

भाजपचा खोडसाळपणा - पटोले

बिटकॉईन प्रकरणात भाजपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी माध्यमांना हाताशी धरून बिटकॅाईनप्रकरणी माझ्यावर खोटे आरोप करून काँग्रेस पक्षाची व माझी बदनामी करण्याचा खोडसाळपणा भाजपने केला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यमांनी या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेऊन वार्तांकन केले पाहिजे. दुर्देवाने भाजपच्या इशाऱ्यावर खोडसाळपणे बदनामी करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे, तो माध्यमांनी तत्काळ थांबवावा अन्यथा खोट्या बातम्या देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही, असे पटोले म्हणाले.

नोंद घेण्याचीही गरज नाही - शरद पवार

शरद पवार याबाबत म्हणाले की, जी व्यक्ती काही महिने तुरुंगात होती, त्याची नोंद तरी कशी घ्यायची. माझ्या मते त्याची नोंदही घ्यायची आवश्यकता नाही, असे म्हणत शरद पवारांनी भाजपवरच उलटा निशाणा साधला. असे आरोप करून भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकते याचे हे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.

हे देशाच्या सुरक्षेसंबंधीचे प्रकरण - फडणवीस

माझे स्पष्ट मत आहे की, यासंदर्भात योग्य चौकशी झाली पाहिजे. काय खरे आहे ते सर्वांसमोर आले पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत. त्यामुळे अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येणे हा जनतेचा अधिकार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.अजित पवार यांनी ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळेंचा असल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण बिटकॉइन, शेकडो कोटींचे आहे. त्यामुळे आमची यंत्रणांकडून अपेक्षा आहे की, याचा ताबडतोब उलगडा केला जावा. याला निवडणुकीसंबंधीचे प्रकरण मानत नाही, हे देशाच्या सुरक्षेसंबंधीचे प्रकरण आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

प्रकरण निवडणुकीसंबंधीचे नाही

भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर लगेच सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांच्या टायमिंगबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, मी काल देखील स्पष्ट केले होते की, त्यांनी (विनोद तावडे) पैसे वाटले नाहीत, तसेच त्यांच्याकडे पैसे सापडले नाहीत. जाणीवपूर्वक गोंधळ घालण्यात आला आहे. असे आरोप केल्यानंतर सत्य काय आहे हे जगासमोर येणे गरजेचे आहे. याची चौकशी करून, याचा एक अहवाल लोकांसमोर आला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी ईडीची रायपूरमध्ये धाड

सुप्रिया सुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ज्या गौरव मेहताचा उल्लेख झाला. त्याच्या रायपूरमधील घरी ईडीने धाड टाकली आहे. २०१८ साली झालेल्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याचा तपास करण्यासाठी धाड टाकल्याचे सांगण्यात आले. माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात गौरव मेहता हा प्रमुख आरोपी असल्याचे म्हटले होते. गौरव मेहता हा एका लेखापरीक्षण संस्थेत सल्लागार असून पुणे पोलीस ६,६०० कोटींच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहे. रवींद्र पाटील यांनी दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौरव मेहताला दूरध्वनी करून क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील रक्कम निवडणुकीच्या कामासाठी मागितली होती. सुळे आणि पटोले यांनी २०१८ च्या बिटकॉइन घोटाळ्याचा गैरवापर केला आहे.

‘तो’ आवाज माझ्या बहिणीचा ‌- अजित पवार

बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, सदर ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे, तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडीत काम केले होते. आता ते विरोधात आहेत. तसेच मधल्या काळात ते भाजपचे खासदारही होते. अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचे थेट नाव घेणे टाळले. या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल. त्यानंतर सत्य समोर येईल, असे अजित पवार म्हणाल्याने ही प्रतिक्रिया बारामतीमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in