सुप्रिया सुळे यांनी केली तलवार म्यान; 'आता पवारांशी लढणार नाही'

गोविंदराव पवार आणि शारदा पवार यांची जी पवार नावाची नातवंडे आहेत त्यांच्याविरोधात यापुढे कधीही निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी येथे केली. गरज पडल्यास आपण आपला मतदारसंघ बदलू.
सुप्रिया सुळे यांनी केली तलवार म्यान; 'आता पवारांशी लढणार नाही'
(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : गोविंदराव पवार आणि शारदा पवार यांची जी पवार नावाची नातवंडे आहेत त्यांच्याविरोधात यापुढे कधीही निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी येथे केली. गरज पडल्यास आपण आपला मतदारसंघ बदलू.

मात्र, पवार कुटुंबातील सदस्याविरोधात निवडणूक लढवणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेने राष्ट्रवादी शरद पवार गटात आश्चर्य व्यक्त होत आहे.

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक आम्ही लढवली नाही. त्या निवडणुकीला मोठा इतिहास आहे, ते सांगणे आज मला गरजेचे वाटत नाही. त्यावेळीही माझी अजिबात इच्छा नव्हती आणि इथून पुढे नसणार, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. अशी लढाई कुठल्या सुसंस्कृत घरात होऊ नये अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. मला देशाची सेवा करायची आहे. दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढवून ते काम करेन, असे त्या म्हणाल्या. पवार कुटुंबावर राज्यातील आणि देशातील लोकांनी विश्वास दाखवला. संघटनेत लाखो कार्यकर्ते आपल्या नेत्यावर विश्वास आणि प्रेम ठेवून काम करतात. त्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांची असहमती

"सुप्रियाताईंनी जी भूमिका घेतली, ती भावनिक होऊन घेतली, कदाचित राजकीय देखील असू शकेल. मात्र, पवार विरुद्ध पवार का झाले याचा विचार करायला हवा. भाजपविरुद्ध किंवा महायुतीविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली आहे. राजकारणात आज एक आणि उद्या दुसरे असे होते. त्यामुळे, सध्या जे महायुतीत आहेत, ते महायुतीत राहणार नाहीत तेव्हाच पवार विरुद्ध पवार होणार नाही," असे म्हणत राष्ट्रवादी श. प. पक्षाचे रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंच्या भूमिकेशी असहमतीच दर्शवली.

logo
marathi.freepressjournal.in