
पुणे : उपराष्ट्रपती पदासाठीचे मतदान जर गुप्त होते, तर नेमके कोणी क्रॉस व्होटिंग केले, हे कसे कळले? "गद्दारी फक्त मराठी माणसानेच केली असे म्हणायचे आहे का?" असा सवाल करत १४ मते फुटली असली तरी ती केवळ महाराष्ट्राचीच कशावरून, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. राहुल गांधींच्या 'व्होट चोरी'च्या मुद्द्याचा संदर्भ देत सुळेंनी या निवडणुकीत देखील वोट चोरी झाली का? असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
महाविकास आघाडीकडून बुधवारी राज्यभरात जनआंदोलन करण्यात आले. यावेळी सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाल्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सात ते आठ खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या खासदारांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) चे ४-५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे २-३ आणि काँग्रेसच्या एका खासदाराचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. या आरोपांवर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी, जर मतदान गुप्त होते, तर नेमके कोणी क्रॉस व्होटिंग केले, हे कसे कळले? असा प्रश्न उपस्थित केला.
करमाळ्यातील आयपीएस अधिकारी डीएसपी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वादात सुप्रिया सुळे अंजना कृष्णा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.
‘‘बेटी बचाव बेटी पढाव म्हणायचे आणि दुसरीकडे लेकींना अशी गलिच्छ वागणूक द्यायची, हे आपल्याला शोभणार नाही,’’ असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला.
जनसुरक्षा विधेयकावरून सरकारला घेरले
सुप्रिया सुळेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर 'जनसुरक्षा विधेयक' आणल्याबद्दल कठोर टीका केली. "नक्षलवाद संपला असे केंद्र व राज्य सरकार म्हणत आहे, तरीही काही राहिलाच असेल तर त्यासाठी सध्या आहे ते कायदे पुरेसे आहेत, मग सरकार जनसुरक्षा विधेयक आणून ते नक्षलवाद संपवण्यासाठी आहे, असे जाहीरपणे कशासाठी सांगते आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.