‘एनडीए’त जाणार नाही - सुप्रिया सुळे

भाजप प्रणित ‘एनडीए’त जाण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावली.
‘एनडीए’त जाणार नाही - सुप्रिया सुळे
‘एनडीए’त जाणार नाही - सुप्रिया सुळेसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : भाजप प्रणित ‘एनडीए’त जाण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावली. तसेच मुख्यमंत्रिपदाच्या वावड्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारामतीच्या जनतेने आपल्याला राज्याचे आणि देशाचे काम करण्यासाठी दिल्लीला पाठवले आहे, बाता मारण्यासाठी नाही.आपण एक प्रामाणिक राजकारणी आणि धोरणकर्त्या असून निराधार चर्चांवर वेळ वाया घालवत नाही, अशा शब्दांत गुरुवारी त्यांनी भुमिका स्पष्ट केली.

पत्रकारांनीही गप्पांऐवजी धोरणात्मक मुद्दे, उत्तरदायित्व आणि प्रशासन यावर लक्ष केंद्रित करावे, असे सुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर, विधिमंडळात ज्यांच्याकडे संख्याबळ असेल तेच मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी भूमिका दिवंगत अजित पवार यांनी गेल्या ४० वर्षांत सातत्याने मांडल्याचे त्यांनी नमूद केले.

तरुण पिढीला उत्तरदायित्वाची अपेक्षा

तरुण पिढी लोकप्रतिनिधींकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा करते आणि आपण आपल्या कामाचा हिशोब देण्यास तयार आहोत, असेही त्या म्हणाल्या. पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या वृत्तांवर बोलताना, 'मजबूत लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे; ज्याप्रमाणे मला बोलण्याचे बळ आहे, त्याचप्रमाणे ऐकण्याची ताकदही माझ्यात असली पाहिजे', असे सुळे यांनी स्पष्ट केले.

पक्षाचे नाव - चिन्ह : न्याय मिळालेला नाही...

शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह या वादात त्यांच्यावर अन्याय झाला असून निवडणूक आयोगासमोर सर्व पुरावे सादर करूनही न्याय मिळालेला नाही, असा आरोप सुळे यांनी केला. पवार यांना न्याय मिळेपर्यंत आणि त्यांनी स्थापन केलेला पक्ष पुन्हा मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी करत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्यात सर्वाधिक गुन्हे पुण्यात घडत असल्याबद्दल सुळे यांनी चिंता व्यक्त केली.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)