राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; सुप्रिया सुळे यांच्या स्पष्टोक्तीने चित्र स्पष्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्या दिवशी निधन झाले त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाला पूर्णविराम मिळाला, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी शनिवारी जाहीर केले. आपला पक्ष भाजपप्रणित रालोआत (एनडीए) सहभागी होणार असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या.
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; सुप्रिया सुळे यांच्या स्पष्टोक्तीने चित्र स्पष्ट
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; सुप्रिया सुळे यांच्या स्पष्टोक्तीने चित्र स्पष्ट
Published on: 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्या दिवशी निधन झाले त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाला पूर्णविराम मिळाला, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी शनिवारी जाहीर केले. आपला पक्ष भाजपप्रणित रालोआत (एनडीए) सहभागी होणार असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अप) हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली.

माझे बंधू अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. त्यासाठी एक तारीखही निश्चित केली होती. मात्र, ज्या दिवशी माझ्या भावाचे निधन झाले, त्याच दिवशी माझ्यासाठी आणि आमच्या पक्षासाठी विलीनीकरणाच्या विषयाला पूर्णविराम मिळाला, असे सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रालोआत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. जर एखाद्या गोष्टीची सुरुवातच झालेली नाही, तर तिला पूर्णविराम देण्याचा प्रश्नच कुठे येतो?, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाकडून विलीनीकरणाबाबत काही विधाने झाली तरीही आपल्या पक्षाने या विषयावर कोणतेही विधान केलेले नाही किंवा दुसऱ्या गटाच्या विधानांना प्रत्युत्तरही दिलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)