

नवी दिल्ली : अजितदादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले. माझा भाऊ आता राहिला नाही. त्यामुळे आता त्या चर्चांना काही अर्थ उरत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी विचारले असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रस्तुत अहवाल अद्याप जाहीर झाला नाही. त्यामुळे सूत्रांच्या अहवालावर मी काहीही बोलणार नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून असे अहवाल प्रत्यक्षात वाचल्याशिवाय मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. असे अहवाल गोपनीय असतात. त्यामुळे ते बाहेर येत नाहीत. त्यातही एखादा अहवाल प्रसिद्ध झाला तर ते वाचल्याशिवाय मी प्रतिक्रिया देत नाही. पण हे प्रकरण उजेडात आल्यानंतर मी त्यात पार्थ पवारांचे नाव आल्याचे टीव्ही चॅनलवर पाहिले होते. त्यानंतर मी स्वतःहून त्याला फोन केला. त्याला या प्रकरणाची माहिती विचारली. त्यावर तो म्हणाला होता की, आत्या मी काहीही चुकीचे केले नाही. यावर मी तुम्हाला सविस्तर सांगेन. त्याच्या या विधानावर मी विश्वास ठेवला.”
“आत्या, मावशी, आई म्हणून आमच्या घरातील मुलांनी कोणतेही चुकीचे काम करू नये, अशी माझी सर्वांकडून अपेक्षा आहे. आमच्या घरात असेच संस्कार दिले जातात. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या देशात कोर्टाचे निर्णय मान्य करायचे असतात. त्याचे काही नियम असतात. मला वाटते की, तो अहवाल व कोर्टाची फायनल ऑर्डर येईपर्यंत कोणत्याही न्यायालयीन प्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही,” असेही सुप्रिया यांनी सांगितले.
पार्थ पवारांवर दबाव टाकला जात आहे का? असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या ती, “तुमचा सोर्सच याची माहिती देऊ शकेल. हे कोण करतंय हे मला कसे कळणार? राज्य किंवा देशातील गोपनीय रिपोर्ट असेल तर तो बाहेर कसा आला? हा प्रश्न आहे.”