मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

सुप्रिया सुळेंनी अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील घरी गेल्या...
मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...
Published on

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघासाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. पवार विरुद्ध पवार असा सामना असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात कांटे की टक्कर आहे. अशात सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्या अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील घरी पोहोचल्या. सुळेंनी आपल्या काकी आशाताई पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि साधारण पाच मिनिटे काकींसोबत चर्चा केली.

सकाळी ११ च्या सुमारास सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडी येथील घरी पोहोचल्या. सुमारे पाच मिनिटे त्या अजितदादांच्या निवासस्थानी होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्यानंतर सुळे अचानक अजितदादांच्या घरी पोहोचल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आणि चर्चांना उधाण आले. दरम्यान यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार घरी होत्या की नाही हे नेमके समजू शकलेले नाही. पण, मी माझ्या काकींचा आशिर्वाद घेण्यासाठी आले होते, असे सुळे यांनी माध्यमांना सांगितले.

भेटीनंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

"माझ्या काका, काकींचे घर आहे. माझे बालपण याच घरात गेले आहे. मी या घरात दोन- दोन महिने राहिले आहे. त्यावेळी दोन-दोन महिने माझ्या आईशी बोलणे होत नव्हते. जेवढे माझ्या आईनी माझे केले नाही, तेवढे माझ्या सर्व काकींनी माझ्यासाठी केले. मी माझ्या काकीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. हे अजित पवारांचे नाही तर, माझ्या काका-काकींचे घर आहे, घरात फक्त मी आणि काकीच होते. मी फक्त काकींची भेट घेतली, असेही त्या म्हणाल्या.

काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात ३ लाख ४ हजार ६०७, इंदापूर ३ लाख २३ हजार ५४१, बारामती ३ लाख ६९ हजार २१७, पुरंदर ४ लाख २९ हजार ३५१, भोर ४ लाख ७ हजार ९२१ व खडकवासला ५ लाख ३८ हजार ३१ असे एकूण मतदार २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात ३८० मतदान केंद्रे, पुरंदर ४२१, इंदापूर ३३०, दौंड ३०९, भोरमध्ये एकूण ५६१, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात ४६५ मतदान केंद्रे आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात २ हजार ५९७ , इंदापूर २ हजार ५१८, बारामती ३ लाख ५००, पुरंदर ३ हजार ३७७, भोर ४ हजार ६२ व खडकवासला मतदारसंघासाठी ४ हजार ४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, बारामतीत पवार काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी चांगलाच जोर लावला आहे, तर शरद पवारांनीही बारामतीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in