अजितदादांना धक्का; शरद पवारच ठरले बॉस

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी झाल्या, तर सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आहेत. अजितदादांसाठी हा मोठा धक्का असून, खरे बॉस हे शरद पवारच असल्याचे यातून दिसून आले आहे.
अजितदादांना धक्का; शरद पवारच ठरले बॉस

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ बंड केले होते. थेट सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपद मिळविले. इतकेच नव्हे, तर त्यांनी मूळ पक्षावर दावा करून पक्ष आणि चिन्हही आपल्याकडे घेतले. अजितदादांनी केवळ राजकीय पातळीवरच वेगळी चूल मांडली नाही, तर बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करून कुटुंबातही उभा दावा निर्माण केला. अजितदादांच्या वाट्याला चार जागा आल्या होत्या. त्यातील फक्त एक म्हणजेच रायगडच्या जागेवर सुनील तटकरे विजयी झाले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी झाल्या, तर सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आहेत. अजितदादांसाठी हा मोठा धक्का असून, खरे बॉस हे शरद पवारच असल्याचे यातून दिसून आले आहे.

शरद पवारांच्या विरोधात जात अजितदादांनी वेगळी चूल मांडली. सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद मिळविले. पक्ष आणि चिन्हावर दावा करत दोन्हीही आपल्या पदरात पाडून घेतले. पण ही लढाई केवळ राजकीय पातळीवरच थांबली नाही. बारामतीच्या जागेवरून पवार कुटुंबातील नातीही पणाला लागली. सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांनी सर्वस्व पणाला लावले होते. दादांनी आक्रमक प्रचार केला.

रायगड, शिरूर, धाराशिवसाठी देखील दादांनी जोर लावला. परभणीतून महादेव जानकरांची पाचवी जागा देखील अजितदादांच्याच कोट्यातून देण्यात आली होती. अजितदादांनी निवडणुकांत पूर्ण ताकदीने प्रचार केला. अनेकदा आक्रमक होत त्यांनी नेहमीच्या शैलीत समोरच्यांना आव्हानही दिले होते.

वाट्याला फक्त चारच जागा आल्या असल्या, तरी त्यातील किमान दोन जागा जिंकणे हे अजितदादांसाठी अत्यावश्यक होते. किमान बारामतीची जागा ही त्यांच्यासाठी फार महत्त्वाची होती. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत फाटाफुटीचे राजकारण झाले होते. पक्ष नेमका कोणाचा यावर तांत्रिक मुद्द्यावर निर्णय झाले असले, तरी शेवटी जनतेचे न्यायालय हे महत्त्वाचे असते. निवडणुकांच्या निमित्ताने जनतेच्या न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा ठरणार होता, जनता नेमकी कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होणार होते. एक्झिट पोलमध्ये अजितदादांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही, असे दाखविण्यात आले होते. पण सुनील तटकरे यांनी रायगडचा गड राखत अजितदादांना किमान दिलासा दिला आहे.

अजितदादांची खरी परीक्षा पुढे!

आता अजितदादांची खरी परीक्षा पुढेच असणार आहे. पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने सोबत आलेल्या आमदारांच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम होणार आहे. शरद पवारांना मिळालेल्या यशाने काहीजण पुन्हा त्यांच्यासोबत जाणार नाहीत, याची खबरदारी अजित पवारांना घ्यावी लागणार आहे. तसेच भाजप देखील आता अजितदादांबाबत काय निर्णय घेते यावर देखील त्यांचे पुढचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in