मुंबई : शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी सूरज चव्हाण यांना मुंबई कोविड काळातील मनपातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने बुधवारी अटक केली. ‘ईडी’ने सूरज चव्हाण व मुंबई मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी बुधवारी छापेमारी केली. त्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
कोविड काळात स्थलांतरित कामगारांना खिचडी वाटप करतानाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी ‘ईडी’कडून सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, कोविड काळात खिचडी वाटपाचे कंत्राट देताना मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे काम सूरज चव्हाण याने केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सप्टेंबर २०२३ मध्ये खिचडी घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर, सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटस्चे राजीव साळुंखे यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. खिचडी वाटप करताना अनेक गैरव्यवहार झाले आहेत. हे कंत्राट अंदाजे ६.३७ कोटी रुपयांचे होते. आरोपींनी इन्व्हाईसमधील संख्येप्रमाणे ‘खिचडी’चे वाटप केले नाही. लोकांना २५० ग्रॅम खिचडी वाटप करणे गरजेचे होते. मात्र कंत्राटदाराने १२५ ग्रॅमची पाकिटे वाटप केली.