मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत राडा करण्याचे प्रकरण राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या अंगलट आले आहे. मारहाणीची दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला आहे. खासदार सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर असताना, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवेदन देण्यासाठी ‘छावा’ संघटनेचे काही कार्यकर्ते आले. यावेळी कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. पत्रकार परिषद सुरू असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत सूरज चव्हाण यांचा सक्रिय सहभाग असल्याचे व्हिडीओतून समोर आले. त्यामुळे सूरज चव्हाण यांचा युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला.
“लातूरमध्ये काल घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांविरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे,” अशा शब्दांत अजित पवारांनी गैरवर्तन करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दम दिला आहे.
जालन्यात राष्ट्रवादीचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न
तटकरे यांच्या रविवारी लातूर दौऱ्यावेळी ‘छावा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद रविवारी मध्यरात्री जालना शहरात उमटले. जिल्ह्यातील ‘छावा’ संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोलने भरलेली पेटती बाटली फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यालयाच्या शटरचे नुकसान झाले. याप्रकरणी ‘छावा’ संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दोन जणांना घेतले ताब्यात
‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी लातूर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांची नावे उघड करण्यात आली नाहीत. तसेच लातूर पोलिसांची तीन पथके इतर आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.