लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर ‘छावा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे मंगळवारी मध्यरात्री आपल्या ९ सहकाऱ्यांसह पोलिसांना शरण आले. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. पोलिसांनी याबाबत अत्यंत गुप्तता पाळत सूरज चव्हाणला पाठबळ दिल्याचे दिसून आल्यामुळे मोठा वादंग होण्याची शक्यता आहे.
सूरज चव्हाण याच्यासह नऊ जण लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात शरण आले होते. सकाळी त्यांची जामिनावर सुटकादेखील करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांची दोन पथके सूरज चव्हाण याच्या मागावर होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यपदाचा राजीनामा घेतल्यानंतर आता सूरज चव्हाण पोलिसांना शरण आले.
यासंबंधी घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक रणजीत सावंत यांनी सांगितले. ‘छावा’ संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आणि मारहाण झालेले विजय घाडगे यांनी लातूर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “हा सर्व बनाव आहे. सूरज चव्हाण यांना या सर्व प्रकरणात वाचवले जात आहे. त्यांना का पाठीशी घातले जातेय? हे मला माहीत नाही,” असा आरोप त्यांनी केला.