
बीड : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतील २६ पोलीस अधिकारी बीडमध्ये कार्यरत आहेत, असे सांगितले. मात्र, त्यांनी सांगितलेला २६ हा फार कमी आकडा आहे. सर्व कर्मचारी, पोलीस अधिकारी यांची बेरीज केली तर ती २०० इतकी होईल. मी लवकरच ही यादी जाहीर करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.
“बीडमध्ये १५० ते २०० पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असतील. मी लवकरच या सर्वांची यादी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. या सर्वांची बदली बीडच्या बाहेर नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेर करावी, असेही मी त्यांना सांगणार आहे. आकाचे पोलीस दलातील जे प्रेमी आहेत, त्यांना आतापर्यंत एसपींनी पोलीस दलातच कसे ठेवले। मी कितीतरी वेळा याबद्दल बोललो आहे. महादेव मुंडेचे आरोपी आकाच्या मुलाच्या अवतीभवती फिरत होते. ते लगेच गायब झाले. त्या डीवायएसपींनी देखील अजून चार्ज घेतला नाही. ते सुद्धा आकाचेच आहेत,” असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
सुरेश धस म्हणाले, “महादेव मुंडेंचे आरोपी सापडले पाहिजेत. ते १५ दिवसांच्या आत जेलमध्ये गेले पाहिजेत. त्यांची हत्या होऊन १५ महिने झाले. अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या झाली. कॉलेजच्या ग्राऊंडमध्ये त्यांना मारण्यात आले. त्यानंतर तहसीलदाराच्या दारात नेऊन टाकण्यात आले. एसपींनी ज्या पद्धतीने यंत्रणा हलवायला हवी, तशी यंत्रणा हलवली जात नाही, असेही सुरेश धस म्हणाले.
अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवारांची भेट
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दमानिया यांनी सर्व पुरावे अजित पवारांना दाखवले आहेत. सर्व पुरावे बारकाईने बघून अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेईन, असे आश्वासन दिले. “धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे कसे संबंध आहेत, त्यांच्यातील आर्थिक व्यवहार या सर्व गोष्टींचे पुरावे अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना दिले आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. तसेच एवढे पुरावे बघून देखील जर कारवाई नाही झाली तर मी टोकाची भूमिका घेईन,” असा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला आहे.
बीडच्या कारागृहात रोज जमते मैफल -आव्हाड
बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडच्या दिमतीला सात पोलीस हवालदार आहेत. तसेच कराडच्या गँगमधील छोटे-मोठे गुन्हेगार तुरुंगातही जमले असून त्यांची रोज मैफल जमत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. “कायद्याने जामीन नाकारलेल्या एखाद्या आरोपीच्या दिमतीला एवढे हवालदार आहेत, हे याआधी महाराष्ट्राने कधीही पाहिले नाही. वाल्मिक कराड हा सरकारपेक्षाही मोठा असून त्याने तुरुंगातही निवांत राहावे, असाच निर्णय शासन दरबारी झाल्याचे दिसतेय. अर्थात, तो वाल्मिक कराड आहे... वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा !! थोडी तरी लाज बाळगा,” अशी टीका आव्हाड यांनी केली.