
बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुप्त भेट घेतल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेले होते. त्यामुळे नेमके काय झाले, याची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे? असा सवालही सुरेश धस यांनी पत्रकारांना केला.
धनंजय मुंडे यांच्या भेटीवर बोलताना सुरेश धस म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलो होतो. यात वेगळी काहीच चर्चा झाली नाही. आमचा लढा सुरूच राहणार आहे. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगळे प्रकार आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. या लढ्यात काहीच फरक पडणार नाही. तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे? तसेच या भेटीचा वेगळा अर्थ तुम्ही काढू नका, असा सल्लादेखील सुरेश धस यांनी पत्रकारांना दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारिक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीत.
हे अतिशय चुकीचे आहे - दमानिया
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, मला देखील चार ते पाच दिवसांपूर्वी समजले होते की, दोघांची भेट झाली. मात्र, मला असे सांगण्यात आले की चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली. पण अशी भेट झाली असेल तर ते फार दुर्दैवी आहे. कारण आता सुरेश धस त्यांच्याविरोधात लढतील की नाही? हे सर्व मला विक्षिप्त वाटते. हे अतिशय चुकीचे आहे.
धस यांची विश्वासार्हता संपली - सुषमा अंधारे
लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार सुरू आहे. यामध्ये तथ्य असेल तर सुरेश धस यांची विश्वासार्हता संपलेली आहे. याचसोबत देवेंद्र फडणवीस यांचीदेखील विश्वासार्हता संपलेली असेल, अशी तीव्र प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.
धसांकडून दगाफटका होईल असे वाटले नव्हते - जरांगे
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी भाजप आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस व धनंजय मुंडे यांची भेट अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही धसांवर खूप मोठा विश्वास दाखवला. पण त्यांनी राजकारण व सत्तेच्या आहारी जाऊन समाजाशी दगाफटका केला. आम्हाला त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
घुलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील एक प्रमुख आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुलेला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले असून, यामुळे त्याच्या अडचणींत चांगलीच वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आमच्यात मतभेद आहेत, मनभेद नाही - बावनकुळे
या भेटीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो. धनंजय मुंडे आणि आमचे जुने संबंध आहेत. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची पारिवारिक भेट झाली. आम्ही तिघेही पारिवारिक भेट म्हणून भेटलो. तेथे ‘कॉम्प्रमाइज’ करायला कोणी सांगितले नाही. आमच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नाही.