माजी मंत्री सुरेश जैन यांचा राजकीय संन्यास, 'या' कारणामुळं घेतला निर्णय; "कोणालाही पाठिंबा नाही"

माजी मंत्री तथा जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे प्रस्थ असलेले सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा नुकताच राजीनामा दिला.
सुरेश जैन
सुरेश जैन संग्रहित फोटो

विशेष प्रतिनिधी/मुंबई:

माजी मंत्री तथा जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे प्रस्थ असलेले सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा नुकताच राजीनामा दिला. त्यानंतर ऐन निवडणुकीत जैन कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कदाचित ते भाजपमध्ये जातील, असेही बोलले जात होते. परंतु ते जळगावमध्ये परतताच त्यांनी आपण राजकीय संन्यास घेतल्याचे जाहीर केले. प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे आपला कोणालाही पाठिंबा असणार नाही. आपण यापुढे कुटुंबासाठी वेळ देणार आहे, असे जाहीर करून टाकले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर आशा लावून बसलेल्या बड्या नेत्यांचा हिरमोड झाला आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांचे जळगावात मोठे प्रस्थ आहे. यापुढे चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहू, असेही ते म्हणाले.

माजी मंत्री सुरेश जैन हे ठाकरे गटाचे सदस्य होते. त्यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे ते ऐन निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासोबतच ते भाजपमध्ये जातील, असाही कयास लावला जात होता. परंतु ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच जळगावात दाखल झाले. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांसोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते राजधानी एक्स्प्रेसने आज जळगावात दाखल झाले. त्यावेळी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी आता आपण सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे आपण राजकीय संन्यास घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या अगोदरच त्यांनी तसे पत्राने कळवले होते. त्यानंतर आज जळगावात पोहोचताच पुन्हा याबाबत स्पष्टीकरण दिले. आपण सक्रीय राजकारणाचा सन्यास घेत आहोत. प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही पक्षात सहभाग नाही-

आपण यापुढे कोणत्याही पक्षात सहभागी होणार नाही. जे चांगले काम करतील, त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची आपली भूमिका असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेली ४० वर्षे मी सक्रीय राजकारणात काम करीत आलो आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील जवळपास प्रत्येकजण जुळला गेला होता. परंतु आता आपण सक्रीय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे माजी मंत्री ज्येष्ठ नेते सुरेश जैन म्हणाले.

सध्याचे राजकारण अत्यंत असमाधानकारक-

राज्यात सध्या जे राजकारण सुरू आहे, ते पाहता त्याबद्दल घृणा निर्माण होऊ लागली आहे. तब्बल ४० वर्षे राजकारण केले. परंतु अशी अवस्था आपण कधीच पाहिली नाही. सध्याचे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, ते पाहता राजकीय स्थिती अत्यंत असमाधानकारक असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in