सुरेश कलमाडी यांना ईडीची क्लीनचिट; तब्बल १५ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहार प्रकरणी पुण्याचे माजी खासदार व स्पर्धा संयोजन समितीचे तत्कालीन प्रमुख सुरेश कलमाडी यांना सीबीआय पाठोपाठ इडीनेही क्लिनचीट दिली आहे.
सुरेश कलमाडी यांना ईडीची क्लीनचिट; तब्बल १५ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता
एएनआय
Published on

पुणे : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहार प्रकरणी पुण्याचे माजी खासदार व स्पर्धा संयोजन समितीचे तत्कालीन प्रमुख सुरेश कलमाडी यांना सीबीआय पाठोपाठ इडीनेही क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे कलमाडी यांची तब्बल १५ वर्षांनंतर घोटाळ्याच्या आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दरम्यान, इडीच्या क्लोजर रिपोर्टनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरेश कलमाडी यांच्या घरासमोर मंगळवारी जल्लोष करत पेढे वाटप केले. 'सबसे बडा खिलाडी' असणाऱ्या सुरेश कलमाडी यांना खोट्या आरोपात गोवण्यात आल्यामुळे पुणेकर एका मोठ्या नेतृत्वाला मुकले, असा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

कलमाडी यांच्याशिवाय आयोजन समितीचे तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत, तत्कालिन महासंचालक व्ही. के. वर्मा आणि कलमाडी यांचे खासगी सचिव शेखर देवरुखकर यांनाही क्लिनचीट दिली आहे. इडीने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट दिल्ली न्यायालयाने स्वीकारला आहे. यामुळे या प्रकरणात मनी लाँडरिंगचा आरोप संपुष्टात आला आहे.

ऑक्टोबर २०१० मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली होती. या स्पर्धेच्या संयोजक समिताचे अध्यक्ष सुरेश कलमाडी होते. त्यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुमारे १ हजार ७०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यावेळी हा तपास केंद्र सरकारने सीबीआयकडे सोपविला होता. त्यानंतर २५ एप्रिल २०११ रोजी सीबीआयने त्यांना अटक केली होती.

क्विन्स बॅटन रिलेच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करून कलमाडी आणि त्यांचे सहकारी ललित भानोत, व्ही. के. वर्मा, शेखर देवरुखकर यांना अटक केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सीबीआयच्या हाती ठोस पुरावे मिळाले होते. त्यामुळे सीबीआयने कलमाडींना १२० ब आणि ४२० कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली होती.

इडीचा क्लोजर रिपोर्ट सादर

सुरेश कलमाडी जवळपास ९ महिने दिल्लीच्या तिहार तुरुंगात होते. त्याच दरम्यान, सीबीआयच्या गुन्ह्याच्या आधारे इडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदविला होता. पण २०१४ मध्ये सीबीआयने त्यांचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, तपासादरम्यान कोणतेही गुन्हेगारी पुरावे समोर आले नाहीत. तसेच एफआयआरमधील आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत असेही म्हटले होते. आता इडीने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in