

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे आज (दि.०६) वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, जावई आणि नातवंड असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
कलमाडी यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कलमाडी यांनी पुण्याचे खासदार म्हणून दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. 'पुणे फेस्टिव्हल' आणि 'पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' यांसारख्या स्पर्धा सुरू करून पुण्याला वेगळी ओळख मिळवून दिली.
१९९५ ते १९९६ या काळात काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारमध्ये त्यांनी रेल्वे खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिला होता. रेल्वे राज्यमंत्री असताना रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव राज्यमंत्री होते. कलमाडी यांनी १९९६ ते २०११ या काळात भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. क्रीडा क्षेत्रातही त्यंचा विशेष प्रभाव होता. त्यांच्या कार्यकाळात भारतात अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीमध्ये २०१० साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजक समितीचे ते अध्यक्ष होते. मात्र, या स्पर्धेदरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या 'कलमाडी हाऊस' या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नवी पेठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.